सांगली : महावितरण कंपनीचा २१ वा वर्धापन दिन सांगली मंडल कार्यालयासह जिल्हाभरात साधेपणाने, मात्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, विद्युत सुरक्षा जनजागृती, वृक्षारोपण आणि स्मार्ट मीटर प्रबोधन असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

वर्धापन दिनाची सुरुवात विश्रामबाग येथील विजयनगर उपकेंद्रात स्वच्छता अभियानाने झाली. अधीक्षक अभियंता अमित बोकील, कार्यकारी अभियंता आशिष मेहता तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छता आणि साहित्य व्यवस्थापन मोहिमेत सहभाग घेतला.

यानंतर सांगली प्रशिक्षण केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच महावितरण मुख्यालय, प्रकाशगड येथे आयोजित 'परिवर्तन-प्रवास महावितरणचा' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी सुरक्षा शपथही घेण्यात आली.

अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी महावितरणच्या २१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहक केंद्रित सेवेमुळे कंपनीने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास तृप्ती दीपंकर, युवराज पाटील, वंदना खोत यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, सांगली मंडलातील सर्व विभागीय व उपविभागीय कार्यालयांमध्ये विद्युत सुरक्षा अभियान-२०२६ अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.