Ticker

6/recent/ticker-posts

स्थायी सभापतिपदी भाजपचे अतुल माने बिनविरोध

 


सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे अतुल माने यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर समाजकल्याण समिती सभापतिपदी गीता पवार (भाजप), महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी बानू जमादार (भाजप) यांचीही बिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती १ च्या सभापतीपदी अश्विनी कोळेकर (काँग्रेस), प्रभाग समिती २ च्या सभापतिपदी वैशाली गवळी (भाजप), प्रभाग समिती ३ च्या सभापतिपदी माया गडदे (भाजप), प्रभाग समिती ४ च्या सभापतिपदी अश्विनी कोळी (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये बहुमत असतानाही भाजपने सभापती पद काँग्रेसला बहाल केले. त्यामुळे भाजपच्या सत्तेत काँग्रेसही सहभागी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या स्थायी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच प्रभाग समिती क्रमांक १, , ३ व ४ च्या सभापती निवडीसाठी शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी सकाळी अकरा वाजता

महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या सभेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. नगरसचिव सहदेव कवडे उपस्थित होते. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे अतुल माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. समाजकल्याण समिती सभापती पदासाठी भाजपच्या गीता पवार यांचाही एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, ही विशेष सभा सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या सूचनेनुसार महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत भाजपकडून नेते सुरेश आवटी, सभागृह नेते संदीप आवटी, नगरसेवक संतोष पाटील, तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे आणि नगरसेवक मयूर पाटील यांनी सहभाग घेतला. नेत्यांच्या सूचनेनुसार या बैठकीत सर्व समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रभाग समिती क्रमांक १ चे सभापती पद काँग्रेसला देण्याचे ठरले. महापौर, उपमहापौर तसेच समिती सभापती निवडी बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने दिलेल्या सहकार्याच्या मोबदल्यात भाजपने हे पद काँग्रेसला दिले.

 भाजप-काँग्रेस समझोता

महिला व बालकल्याण सभापती निवडीची प्रकिया सुरू झाली. भाजपच्या उमेदवार बानू जमादार (मिरज) व काँग्रेसच्या उमेदवार अंजली जाधव यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. छाननीत हे अर्ज वैध ठरले. मात्र भाजप-काँग्रेस समझोत्यानुसार काँग्रेसच्या जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या बानू जमादार यांचीबिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती क्रमांक २ च्या सभापतिपदी भाजपच्या वैशाली गवळी यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापतिपदी माया गडदे, प्रभाग समिती क्रमांक ४ च्या सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अश्विनी कोळी यांची बिनविरोध निवड झाली. नूतन

सभापतींच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली.

आमदार सुधीर गाडगीळ, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, मंजिरी गाडगीळ, सिद्धार्थ गाडगीळ यांनी सर्व नूतन सभापतींचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments