Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिका कार्यालयाच्या दारातच धोकादायक वृक्ष; दुर्घटनेची वाट पाहतेय का प्रशासन?

 


सांगली : सांगली महापालिकेसमोर असलेल्या एक नंबर चौकात धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या वृक्षामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वृक्ष ज्या ठिकाणी उभा आहे, त्या समोरच महापालिकेच्या बागा विभागाचे कार्यालय असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 सदर वृक्ष कोसळण्याच्या अवस्थेत असून त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे हा वृक्ष कोसळल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

 स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असतानाही अद्याप महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या कार्यालयासमोरच हा धोकादायक वृक्ष उभा असताना देखील अधिकाऱ्यांना तो दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 उद्या जर एखादी मोठी दुर्घटना घडली आणि एखाद्या वाहनावर किंवा नागरिकांवर हे झाड कोसळले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनावरच राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या बागा विभागाने तातडीने या वृक्षाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Post a Comment

0 Comments