Ticker

6/recent/ticker-posts

अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कृती समितीतर्फे सह्यांची मोहीम

 

सांगली : गेल्या काही वर्षांपासून कृष्णा व तिच्या उपनद्यांना सातत्याने महापूर येत आहे. अलमट्टी धरणामुळे हा महापूर येत असल्याचा आरोप होत असतानाच, आता या धरणाची उंची वाढविण्याचा घाट सुरू आहे. त्याविरोधात महापूर कृती समितीतर्फे शुक्रवारी सांगलीतील गणपती मंदिरासमोर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सुमारे ८०० जणांनी सह्या करून, अलमट्टीची उंची वाढविण्यास विरोध दर्शवला.

दरम्यान, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, नागरिक अशा ८० जणांनी ४०० तक्रारपत्रे मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय व जल आयोगाला पाठविली.

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. हा महापूर अलमट्टी धरणामुळे येत असल्याचा आरोप होत आहे. या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत, त्याचवेळी या धरणाची उंची वाढविण्याच्या हालचाली कर्नाटक सरकारने सुरू केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार अद्याप शांतच आहे. त्यामुळे महापूर कृती समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. ते याबाबत जनजागृती करीत आहेत. आमदार लाड यांनी बैठक घेऊन, धरणाची उंची वाढविण्याविरोधात जोरदार लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन जिल्ह्यांत एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे. त्याचवेळी समितीतर्फे नागरिकांतून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी येथील गणपती मंदिरासमोर दोन तास मोहीम राबविण्यात आली. सुमारे ८०० लोकांनी सह्या करून विरोध दर्शवला.

यावेळी प्रदीप वायचळ, प्रमोद माने, प्रभाकर केंगार, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, सर्जेराव पाटील, ओंकार दिवाण, मोहन जामदार आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments