मिरज : जीवनात अनेक चुका होतात, त्या
सुधारण्याची संधी पत्रकारांमुळे मिळते. चुका दाखविल्या की त्यातून शिकण्याची संधी
मिळते. लोकशाहीसाठी राबणाऱ्या पत्रकारांना पेन्शन, हक्काचे घर,
पत्रकार
भवन, पत्रकारांचा आरोग्य विमा यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी
मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावून प्रश्न मार्गी लावू, असे मत
पालकमंत्री तथा उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास
मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसमध्ये
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजीटल मिडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले
त्याचे उद्घाटन श्री. गोरे यांच्याहस्ते तर समारोप चंद्रकांतदादा पाटील
यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार
गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, महाराष्ट्र
राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, डिजीटल मिडिया
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे, माजी जि. प.
अध्यक्ष शिवाजी डोंगरे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे नूतन
कार्याध्यक्ष किरण जोशी आदींसह राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.
अशोक वानखेडे म्हणाले, ग्रामीण भागात खरी पत्रकारिता टिकून आहे.
मुंबईसारख्या शहरात फिरून बातम्या घेणे बंद आहे. केवळ बाईट घेऊन बातम्या लावल्या
जात आहेत. कोविडच्या काळात डिजीटल मिडियाला मागणी वाढली.
प्रास्ताविकात संजय भोकरे म्हणाले, डिजीटल
मिडियाने समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे. समाज व प्रशासन यांच्यातील उत्तम दुवा
म्हणजे मीडिया आहे. पुणे येथे पत्रकारांसाठी सर्किट हाऊस उभारण्यासाठी महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ दिवसात बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. हा प्रश्न
लवकरच मार्गी लागेल.
स्वागत करताना डिजीटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष
सिद्धार्थ भोकरे यांनी पत्रकारांचे विविध प्रश्नांची व संघटनेची माहिती दिली. आभार
समीर देसाई यांनी मानले.

0 Comments