Ticker

6/recent/ticker-posts

'हर हर महादेवऽऽ' च्या जयघोषाने हरिपूर दुमदुमले

 

हरिपूर : हरिपूर (ता. मिरज) येथे महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हरिपूर हे ठिकाण कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

पहाटेपासूनच मंदिर परिसरात 'हर हर महादेवऽऽ'च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. सकाळी काकड आरती, रुद्राभिषेक, महाआरती, प्रसादाचे वाटप, ३ वाजता महापूजा, सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ओंकार पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूजा बांधली होती. यावेळी हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, उपसरपंच गणपती साळुंखे, तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य अरविंद तांबवेकर, नूतन पंचायत समिती सदस्या शोभा मोहिते, पोलिस पाटील उमाकांत बोंद्रे यांच्यासह देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. दिवसभर आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पोलिस आणि मंदिर प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी संगमेश्वर मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. देवस्थान समितीतर्फे पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यात्रेत खेळणी, मिठाई, इतर घरगुती वस्तूंची दुकाने थाटली होती. सांगलीतून बस सेवा बंद असल्याने रिक्षांच्या फेऱ्या सुरू होत्या. मंदिर परिसरात अनेक भाविकांनी प्रसादाचे वाटप केले. महाशिवरात्र आणि रविवारनिमित्त शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुटी असल्याने दुपारनंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाली होती.

केशवनाथ मंदिरात गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील केशवनाथ मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. संजय गुरव यांनी आकर्षक पूजा बांधली होती. पहाटे काकड आरती, आभिषेक, महाआरती तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे पठण करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात मिठाई, फूल विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments