स्टँड परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी, महिला प्रवाशांचे हाल
सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या
सुशोभीकरणासाठी आणि विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची असलेली मूलभूत सुविधा म्हणजे सार्वजनिक
शौचालय आजही दुर्लक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शौचालयाला कुलूप
असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
शौचालय बंद असल्याने सांडपाणी बाहेर वाहत असून संपूर्ण
एसटी स्टँड परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान
मुले तसेच स्थानकातील कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिला
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांची अक्षरशः गैरसोय होत आहे.
"स्थानकासाठी कोट्यवधींचा खर्च झाला, पण शौचालयाला कुलूप आणि देखभालीसाठी आवश्यक तेवढाही खर्च झालेला दिसत नाही,"
अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे
नगरसेवक अशोक मासाळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एसटी स्थानक प्रशासनाला
जाब विचारला. त्यावेळी प्रशासनाने महानगरपालिकेशी आवश्यक पत्रव्यवहार झाल्याचे
सांगत,
समस्या लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, या शौचालयाचा वापर दररोज
मोठ्या प्रमाणावर प्रवासी करत असल्याने सांडपाण्याच्या टाकीचा किमान महिन्यातून
एकदा नियमित उपसा करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नियमित देखभाल आणि
स्वच्छतेचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला
जात आहे.
प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण
झालेल्या या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन शौचालयावरील
कुलूप काढून ते त्वरित सुरू करावे, तसेच सांडपाण्याची समस्या
दूर करून स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी
नागरिकांकडून होत आहे.
0 Comments