सांगली : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र
कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने शिवसेना व
शिवसेना क्रीडा सेनेच्या वतीने ‘सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा’ हा अभिनव उपक्रम
राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ६ ऑगस्ट रोजी सांगलीतून विशेष
रेल्वेद्वारे रक्तदाते आणि शिवसैनिक दिल्लीकडे रवाना होणार असून, तेथे भारतीय सैन्याच्या जवानांसाठी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध
भागांतील हजारो रक्तदाते सहभागी होणार आहेत. सैनिकांच्या सेवेसाठी रक्तदानासारखे
पवित्र कार्य करून समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा या यात्रेचा उद्देश
असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महारक्तदान
शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग सशस्त्र दलातील जवानांसाठी केला जाणार आहे.
रक्तदानासोबतच सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करणारे विविध कार्यक्रमही आयोजित
करण्यात येणार आहेत.
या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आवश्यक
सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रवासाचे नियोजन
पूर्ण झाले आहे. सांगली रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेला उत्साहपूर्ण वातावरणात
निरोप देण्यात येणार आहे.
या उपक्रमात मोठ्या संख्येने युवक, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिकांनी सहभागी
होऊन रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांनी केले
आहे. समाजहित आणि राष्ट्रहित यांचा संगम साधणारा हा उपक्रम ठरणार असल्याचा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला.
0 Comments