Ticker

6/recent/ticker-posts

आयुक्तांनी त्या कारखान्यांवर कारवाईचे धाडस दाखवावे : पृथ्वीराज पवार

 

सांगली : कृष्णा नदीत कारखान्यांनी मळी व केमिकल मिश्रित पाणी सोडले आहे. शेरीनाल्याचे मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत आहे. हजारो मासे मेले आहेत. शहरातील पाच लाख लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. या स्थितीत महापालिका प्रशासन नदीत विष सोडणाऱ्यांवर त्यांचा बुलडोझर का चालवत नाहीत ? कृष्णेत विष मिसळले जात असताना आयुक्त गप्प कसे? एका वर्षात सातवेळा नदीत विषारी पाणी सोडण्यात आले तरीही आयुक्त कारवाईचे धाडस दाखवत नाहीत. गोरगरीबांवर कारवाई करताना 'शक्तीमान' असलेले आयुक्त बड्यांविरुध्द मात्र 'गंगाधर' बनत असल्याची टीका भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केली.

पृथ्वीराज पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत त्यांच्या दारात जाऊन कारवाई करावी. कृष्णा नदीत मळी व रासायनिक पाणी सोडण्याचे पाप काही बडे कारखानदार सातत्याने करत आले आहेत. संबंधित कारखान्यांना नोटीस काढली गेली आहे. एका कारखानदारांनी गेल्या १ वर्षात किमान ७ वेळा नदीत मळी व रासायनिक पाणी सोडले. या विरोधात मार्च २४ मध्ये सांगलीकर व अनेक निसर्ग संवर्धन संस्था रस्त्यावर उतरून मानवी साखळी केली. राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेतली. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतुदीसाठी पाठपुरावा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा निवडणुकीआधी तसा शब्द दिला आहे. येत्या बजेटमध्ये ९४ कोटींच्या प्रस्तावासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात काम सुरू होवून पूर्ण व्हायला किमान ६ ते १२ महिने लागतील. तोवर मासे सोबत आता माणसं मरायची भीती आहे.

पृथ्वीराज पवार पुढे म्हणाले, गोरगरिबांच्या खोक्यांवर २४ तासांची मुदत देऊन बुलडोझर चालवणारे आयुक्त गांधी यांचा बुलडोझर नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर चालणार का? गरिबांचा विषय येतो तेंव्हा तुम्ही 'शक्तीमान' असता, बड्यांचा विषय आला की तुमचा 'गंगाधर' का होतो? तुम्ही सपशेल अपयशी ठरलेले आहात. रासायनिक पाणी नाल्यांमध्ये सोडून सांगलीकरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या 'मुळ स्त्रोत' कारखान्यांवर गेल्या वर्षभरात कारवाई का केली जात नाही? कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे सांगली शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. अनेक ठिकाणी लिकेजमुळे नळाला अत्यंत गढूळ, दूषित पाणी येत आहे. महापालिकेतील ७८ नगरसेवकांनी आता तरी आयुक्तांवर दबाव निर्माण करावा. महापालिकेला शेरीनाल्याचे पाणी उपसणारे पंप सुरु ठेवता आले नाहीत. ते पंप तातडीने सुरु करावेत अशी मागणी पवार यांनी केली.


Post a Comment

0 Comments