सांगली : शामरावनगर येथे दफनभूमीसाठी
महापालिकेने ५.४७ एकर जागा खरेदी केली आहे. मात्र त्यातील ३.९७ एकर जागा क्रीडांगण
वापरासाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासक कालावधीत शासनाला सादर झालेला
आहे. हा विषय लोकनियुक्त महासभेकडे विचारार्थ येण्यासाठी शासनस्तरावर राजकीय ताकद
लावली जाईल. क्रीडांगण आरक्षणाचा प्रस्ताव रद्दसाठी पाठपुरावा केला जाईल.
कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी
स्पष्ट केले.
मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी शामरावनगरमधील आरक्षित ५.४७ एकर जागा महापालिकेने २५.५८
कोटी रुपये मोबदला देऊन ताब्यात घेतलेली आहे. त्यातील ३.९७ एकर जागा
क्रीडांगणासाठी व १.५ एकर जागा दफनभूमीकरिता वापर करण्याचा निर्देश डिसेंबर २०२५
मध्ये झालेल्या बैठकीत आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार प्रस्ताव शासनाकडे सादर
आलेला आहे. त्यावर अनेक नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर
महापौर सूर्यवंशी म्हणाले, शासनस्तरावर राजकीय ताकद लावून हा
प्रस्ताव परत लोकनियुक्त महासभेपुढे येण्यासाठी पाठपुरावा
केला जाईल. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही.
ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी
भाजप नेत्या जयश्री पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर
गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अतिरिक्त
आयुक्त राहुल रोकडे यांची भेट घेतली. महापालिकेने दफनभूमीसाठी खरेदी केलेल्या
जागेत अन्य कोणतेही आरक्षण प्रस्तावित करू नयेत. केलेला प्रस्ताव रद्द करावा.
खरेदी केलेली जागा ख्रिश्चन व मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी विकसित करावी,
अशी
मागणी करण्यात आली.
दरम्यान, जयश्री पाटील व महापौर सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी
दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रशासक कालावधीतील हा प्रस्ताव रद्द करण्याची
कार्यवाही करावी, अशी मागणी केली. पालकमंत्री पाटील यांनीही
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून सूचना दिल्या.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, अशोक
लोंढे, सुमंत नवगिरे, जालिंदर आवळे, सुनील मगदूम,
सतीश
घाडगे, मार्क मगदूम, सुरेश सोनकांबळे, अनिल
सातपुते, दिलीप माळी, प्रकाश रेड्डी, शमुवेल आवळे,
सूर्यकांत
लोंढे, दीपक सोकटे, कपिल आवळे, निशांत आवळे,
शीतल
लोंढे उपस्थित होते.
0 Comments