Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेने खेळाडू, क्रीडांगणांसाठी प्राधान्याने तरतूद करावी : आ. सुधीर गाडगीळ

 

सांगली : शहरातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चकमले आहेत, आणखी खेळाडू घडत आहेत. खेळाडुंना सुविधा मिळणे आवश्यक आहेत. महापालिकेने क्रीडा क्षेत्रासाठी प्राधान्यक्रम ठरवून पाच वर्षे निधीची तरतूद करावी, अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या, स्टेडियम, क्रीडांगणांचा विकास व सुविधांवर भर द्यावा. क्रीडा क्षेत्रासाठी शासन नियमानुसार किमान ५ टक्के निधी खर्च झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांच्या पुढाकाराने महापालिका सभागृहात महापालिका क्षेत्रातील क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप नेत्या जयश्री पाटील, आयुक्त सत्यम गांधी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, समाजकल्याण सभापती गीता पवार, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरूटे तसेच विविध क्रीडा संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पृथ्वीराज पवार म्हणाले, महापालिकेने क्रीडा समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे विविध ३७ प्रकारचे खेळ खेळले जातात, पण त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत. ज्योतिरामदादा कुस्ती आखाड्यात महिला कुस्ती केंद्रही तयार करावे. महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी पाच टक्के निधी क्रीडा क्षेत्रावर खर्च करावा. क्रीडा संस्था, संघटनांचा मालमत्ताकर (घरपट्टी) कमी करावा. सांगलीत कृष्णा नदी पात्रात आंतरराष्ट्रीय रोईंग ट्रॅक विकसित करावा.

खेळाडूंसाठी हॉस्टेल बांधावे, महापालिकेने मानधनावर खेळाडू घ्यावेत, अशी मागणी हरिदास पाटील यांनी केली. महापालिका क्षेत्रासाठी क्रीडा धोरण निश्चित करावे, अशी मागणी भारत खांडेकर यांनी केली. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पावसाळ्यात तीन महिने पाणी साठत असल्याकडेही क्रीडा संघटना प्रतिनिधींनी लक्ष वेधले.


Post a Comment

0 Comments