सांगली : महापालिकेतील भाजपचे १० नगरसेवक काँग्रेसच्या
संपर्कात आहेत. ते गटबाजी व कामे होत नसल्याने वैतागले आहेत. त्यांच्यासोबत दोन
गुप्त बैठकाही झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत भाजपची काही मते फुटणार आहेत, असा गौप्यस्फोट महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश
चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज
गायकवाड व नगरसेवक सुरेश बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचेही काही
नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे
गटनेते मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिकेत भाजपमध्ये
गैरमेळ आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये गटबाजी आहे. त्याला
भाजपचे काही नगरसेवक वैतागले आहेत. ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विधानपरिषद
निवडणुकीत काँग्रेसचा
तगडा उमेदवार असणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने
काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम तसेच खा. विशाल पाटील यांनी कामाला
लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरसेवकांशी संपर्क सुरू आहे. या निवडणुकीत
भाजपची काही मते फुटलेली दिसतील.
चव्हाण म्हणाले, भाजपचे नेते पक्ष
वाढवणे, शहरातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी काम
करण्याऐवजी विरोधकांचे नगरसेवक फोडण्यात गुंग आहेत. त्यांनी दुसऱ्याचे पक्ष
फोडण्यापेक्षा रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज,
कचरा आदी समस्यांवर सत्ताधाऱ्यांनी काम करावे. नगरसेवकांच्या
व्यक्तीगत समस्या सोडवून त्यांना पक्षात ओढण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित
कोळी यांना त्या पक्षाचे गटनेतेपद देणे आवश्यक आहे, असेही चव्हाण
म्हणाले.
0 Comments