Ticker

6/recent/ticker-posts

सायबर गुन्ह्यांची साखळी रोखणार : विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा

 

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान असले, तरी ही साखळी मोडीत काढण्यासाठी निश्चित पाठपुरावा करण्यात येईल. मुख्य सूत्रधारांना टार्गेट केल्याशिवाय फसवणुकीचे प्रकार थांबणार नाहीत, अमली पदार्थ तस्कर, संघटित गुन्हेगारी टोळ्या, काळेधंदेवाल्यांसह समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्याचा वचक राहील, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी दिला. कोल्हापूर परिक्षेत्रात लोकाभिमुख पोलिसिंग देण्यावर भर असेल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक शर्मा यांनी शुक्रवारी तत्कालीन पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सायंकाळी पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मा म्हणाले, सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांना टार्गेट करूनच अधिकाऱ्यांनी पावले उचलली पाहिजेत, त्यासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारांची साखळी मोडीत काढण्यावर आपला भर राहील. नागरिकांनीही अशा टोळ्यांपासून सावध राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

कोल्हापूरसह परिक्षेत्रात 'नशामुक्त प्रभाग' ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे. अमली पदार्थ, बनावट दारू, गुटखा तस्करी रोखण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच समाजकंटकांवर अंकुश राहिला पाहिजे. गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments