सांगली : शहरातील विठ्ठलनगर येथे असणार्या एका लॉजवर नेऊन महिलेवर
चाकूहल्ला करण्यात आला. यामध्ये अरुणा अभिजित कोळी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी त्यांनी संतोष गुरुदत्त कोळी (वय ३७, रा. कोळी गल्ली, जत) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी अरुणा कोळी या जुना - धामणी रस्त्यावर वास्तव्यास
आहेत. संशयित संतोष कोळी हा त्यांच्या ओळखीचा आहे. तो दि. २५ जानेवारी रोजी
त्यांच्या घराजवळ आला. यावेळी त्याने कोयत्याचा धाक दाखवून घराचे दरवाजावर,
खिडक्यावर कोयत्याने हल्ला करून काचा फोडल्या.
तसेच त्यांची दुचाकी व मुलाच्या सायकलचीही तोडफोड करून ३० हजार रुपयांचे नुकसान
केले. त्यानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी संशयित संतोष याने जखमी अरुणा यांना दि.
१६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता विठ्ठलनगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर
त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी त्यांच्या
डोक्यात, दोन्ही हातावर,
पायावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले,
असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले
आहे. यानुसार संतोष कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments