सांगली : माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील हुपरी
गार्डनमध्ये एका लग्नसमारंभात ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरलेल्या
संशयित फिरासत फक्रुद्दीन शेख (वय २२, रा. मकान गल्ली, खणभाग, सांगली)
याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हुपरी
गार्डन येथे दि. ३ रोजी लग्नसमारंभ होता. लग्नाची धामधूम सुरू असतानाच संशयित शेख
याने तेथे प्रवेश केला. तेथे शुभम अनिल देसाई (रा. गव्हन्र्मेंट कॉलनी, विश्रामबाग)
यांच्या पत्नीच्या बॅगेतील सोन्याचे तीन तोळ्यांचे गंठण त्याने लंपास केले. दुपारी
पावणेबारा ते साडेचार यादरम्यान हा प्रकार घडला. दुपारी साडेचारच्या सुमारास देसाई
यांना पत्नीच्या बॅगेतील गंठण लंपास
झाल्याचे समजताच सर्वत्र शोधाशोध केली, तेव्हा
चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद
दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे
यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. पथकाने
कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बघून तपास सुरू केला. तेव्हा रेकॉर्डवरील आरोपी
फिरासत शेख याचे नाव निष्पन्न झाले. त्याचा माग काढत असतानाच तो चिन्मय पार्कजवळ
सोने विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात
घेतले. झडती घेतल्यानंतर सोन्याचे गंठण मिळाले. कसून चौकशी केल्यानंतर, त्याने
हुपरी गार्डनमध्ये लग्नसमारंभात चोरी केल्याची कबुली दिली.
0 Comments