Ticker

6/recent/ticker-posts

जनहितास प्राधान्य देणारा जिल्हाधिकाऱ्यांचा 'सांगली पॅटर्न'

 

सांगली : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सांगली पॅटर्न हा सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारा ठरला आहे. प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून, चौकटीबाहेर जाऊन समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे. त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारून गुरुवारी (१२ फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण - झाले. यानिमित्ताने अनेकांनी त्यांना - शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्ह्याचा हा विकास पॅटर्न येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी पथदर्शक ठरेल, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

प्रशासन जेव्हा संवेदनशील योजना केवळ कागदावर न ठेवता लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, हे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. राज्यात पहिल्यांदाच जिल्हा प्रशासनाने अशोक काकडे दिव्यांग विद्यार्थी आणि बालगृहातील मुलांसाठी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षणाचे आयोजन केले. या प्रशिक्षणामुळे वंचित घटकातील मुले तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नारीबलम अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. मालमत्तेवर केवळ पुरुषांचाच अधिकार नसावा, या विचारातून पतीच्या सात-बारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. यात सुमारे ११ हजार ४१२ महिलांना मालकी हक्क मिळाला आहे.

माध्यमिक शाळांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थिनींना कराटेचे धडे दिले जात आहेत. धुणी-भांडी करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी शिबिरे घेण्यात आली. यामध्ये जवळपास ३ हजार घरेलू कामगार महिलांची मोफत तपासणी करून गंभीर आजार असलेल्या ७१९ महिलांवर यशस्वी उपचार करून त्यांना निरोगी आयुष्य दिले आहे. शेतकरी केवळ उत्पादक न राहता तो व्यापारी बनावा, यासाठी सांगली पॅटर्नने जागतिक बाजारपेठेची दारे उघडली आहेत. जिल्ह्यातील फळपिकांच्या निर्यातीस चालना देण्याच्या अनुषंगाने कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या मुहूर्तावर दर्शन एक्स्प्रेसने २४ टन शेतीमाल दिल्ली येथे पाठविला. समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या एचआयव्हीग्रस्तांसाठी वधू-वर मेळावा भरवून ७ जोडप्यांचे यशस्वी विवाह लावून दिले. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी असाच दुसरा वधू-वर मेळावा नियोजित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून वस्तूंची विक्री करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले ५३६ अतिक्रमित पाणंद रस्ते खुले करण्यात आले. यामुळे ४६४ कि.मी.चे रस्ते शेतीसाठी उपलब्ध होऊन २३ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही प्रशासकीय कामे यशस्वीपणे राबवून विविध उपक्रम राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments