सांगली : महापालिकेत
महापौर उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती, चार प्रभाग
समित्या, महिला व बालकल्याण समितीच्या निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष
लागले आहे. या निवडी सर्वसाधारण सभेत करण्याचे संकेत आहेत. त्यात सत्ताधारी भाजपने
विशेष सभा घेऊन निवडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे, पण त्यावरून
कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रशासनानेही
याबाबत अभिप्राय घेऊनच सदस्य निवडीची सभा घेण्याचे नियोजन केले आहे. मार्च
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभा घेऊन सदस्य निवडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महापौरपदी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम यांची निवड झाली, तसेच सभागृह नेतेपदी संदीप आवटी, तर विरोधी पक्षनेतेपदी मंगेश चव्हाण यांच्या
नावाची घोषणा झाली.
आता स्थायी समितीच्या
१६ सदस्यांच्या निवडीची उत्सुकता लागली आहे. पक्षीय संख्याबळानुसार भाजपचे ८, काँग्रेस ४, राष्ट्रवादी (अजित पवार) ३ तर राष्ट्रवादी (शरद पवार) १
असे सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत. भाजपमधून अतुल माने, गणेश माळी, संतोष पाटील, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई, पद्मश्री पाटील, मोहन वाटवे, मीनाक्षी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमधून मयूर पाटील, वर्षा निंबाळकर, दीपाली पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण, बिलकिस बुजरूक तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून अभिजित भोसले, विष्णू माने, नसिमा नाईक, रेश्मा चौधरी, शैला दुर्वे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटातून सुरेश बंडगर, अभिजीत कोळी
यांची नावे शर्यतीत आहेत.
चार प्रभाग समित्या
गठीत होण्याची शक्यता
याशिवाय चार प्रभाग
समित्यांचे गठीत केल्या जाण्याची शक्यता आहे. या चारपैकी किमान तीन समितीवर
वर्चस्व राखण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न राहणार आहे. महिला व बालकल्याण समिती
सदस्यांच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निवडीसाठी
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभा होण्याची शक्यता आहे. सदस्य निवडीसाठी
सर्वसाधारण की विशेष सभा असा पेच आहे. त्यातून नगरसचिव कार्यालयाकडून मार्ग काढला
जात आहे.
0 Comments