मिरज : मिरजेत पोटच्या दोन पोरांची फक्त ४० हजार रुपयांना आईनेच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या बालकांच्या आईसह ५ जणांना मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन वर्षांपूर्वी
घडलेला हा प्रकार आता समोर आला असून, तेव्हा साधारण दोन वर्षे वय असणारी ही मुले
सध्या साडेतीन ते चार वर्षांची आहेत. याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी
महादेव वाघमारे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये बालकांची आई मनीषा रोहित जाधव (रा.
सुभाषनगर, मिरज), एजंट सचिन ऊर्फ उमाजी गणेश लोंढे (रा. शासकीय
दूध डेअरीजवळ, मिरज), महापालिका प्रसूती विभागातील कर्मचारी सुरेखा
चंद्रकांत लोंढे (रा. कोल्हापूर चाळ, मिरज), दशरथ तुकाराम लोंढे (रा.
कोल्हापूर चाळ, मिरज) आणि पोरं विकत घेणारा संजय दिलीप गोसावी
(रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांचा समावेश
आहे.
मनीषा जाधव ही
मिरजेतील सुभाषनगर येथे वास्तव्यास आहे. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती
अनाथ आहे. तिने रोहित नामक तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. रोहित हा व्यसनी
असल्याने भंगार गोळा करून ती आपला उदरनिर्वाह चालवत होती. मनीषा व रोहित यांना दोन
मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. तिची प्रसूती महापालिकेच्या प्रसूती विभागात
झाल्याने ती सुरेखा हिच्या संपर्कात होती. यातून सुरेखा आणि सचिन ऊर्फ उमाजी या
दोघांनी २०२४ मध्ये मनीषा हिच्या एका मुलाची कर्नाटकात विक्री केली. त्यावेळी तिने
मनीषाला वीस हजार रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या मुलाला माधवनगर येथील संजय गोसावी
याला बोगस दत्तकपत्र तयार करून २० हजार रुपयांना विकले. अशी ४० हजार रुपयांना दोन
बालकांची विक्री करण्यात आली होती. संबंधित दोन बालकांची विक्री केल्यानंतर मनीषा
तिसऱ्या मुलीचीही विक्री करण्याच्या प्रयत्नात होती. दरम्यान, मिरजेत आईनेच बालकांची पैसे घेऊन विक्री केली
असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांना मिळाली. त्यांनी
या घटनेची चौकशी सुरू केली असता, हा धक्कादायक
प्रकार समोर आला.
मनीषा जाधव
मिरजेत मिळेल त्या ठिकाणी वास्तव्य करून आपला उदरनिर्वाह चालवते. तिला दोन बालके
सांभाळणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे या निर्दयी आईने ४० हजार रुपयांना आपल्या
दोन्ही बालकांची विक्री केली असल्याचे तपासात समोर आले. बेकायदेशीररित्या बालकांची
विक्री करून ती दत्तक दिल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही चौकशीमध्ये समोर आले.
याप्रकरणी जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी बालकांच्या आईसह बालकांची खरेदी
करणाऱ्यांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीन
न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५ या कलमान्वये मिरज शहर पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बालकांची विक्री करणाऱ्या आईसह
पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिरज शहर पोलिस
ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण
पथकाचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह सहायक निरीक्षक दत्तात्रय
पुजारी, सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक स्नेहा शिर्के, हवालदार प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, दीपक परीट
यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments