सांगली : जिल्हा
परिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी भोसे (ता. मिरज) जिल्हा परिषद मतदारसंघाचे नूतन
सदस्य आशिष जाधव यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक
यांनी ही घोषणा केली. दरम्यान, जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार.
महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील त्या पद्धतीने काम करू, अशी ग्वाही
यावेळी भाजप नेत्यांनी दिली.
विश्रामबाग येथील
भाजपच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते निवडीची प्रक्रिया पार
पडली. आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित
देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा सरचिटणीस विलास
काळेबाग तसेच भाजपचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेत भाजपचे १६
सदस्य आहेत. त्यापैकी १४ सदस्य नवखे आहेत. गटनेतेपदासाठी चार नावे प्रदेश भाजपकडे
पाठविण्यात आली होती. त्यातून आशिष जाधव यांची गटनेतेपदासाठी निवड झाली.
आ. खाडे म्हणाले, जिल्हा परिषद
सदस्यांनी जनकल्याणाची कामे करावीत. महिला सदस्यांनी कामकाजात लक्ष द्यावे, पतीराजांवर
अवलंबून राहू नये. आ. पडळकर म्हणाले, जिल्हा परिषदेत महायुतीकडे संख्याबळ आहे.
महायुतीमध्ये कुणी नाराज नाही, जर कुणी नाराज असेल तर, त्यांच्याबाबत
वरिष्ठ नेत्यांकडून मार्ग काढला जाईल. अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करायची याबाबतचा
निर्णय वरिष्ठ नेते घेतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे नेते जो
निर्णय घेतील, त्या पद्धतीने काम करू.
0 Comments