सांगली : अनेक
ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे गुरुवारपासून रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र
महिना सुरु झाला. बुधवारी सायंकाळी चाँद दिसल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या
उपवासांना गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. चाँद कमिटीने १९ पासून रमजान सुरू
होणार असल्याची घोषणा केली. चंद्रदर्शननंतर एकमेकाना चाँद मुबारक म्हणून शुभेच्छा
देण्यात येत होत्या.
चंद्रदर्शन
झाल्यामुळे गुरुवारपासून रमजानला प्रारंभ होत आहे. मुस्लिम बांधवांनी बुधवारी
सायंकाळी सर्व मशिदींमध्ये तराबिहची नमाज अदा केली. ही नमाज आता २९ दिवस अदा केली
जाणार आहे.
रमजानच्या
पार्श्वभूमीवर बाजारात फळ, खजूरसह इतर साहित्यांच्या खरेदीला मुस्लिम
बांधवांनी गर्दी केली होती. उपवासासाठी खजूरची खरेदी मोठ्या प्रमाणात होत
असल्यामुळे दत्त मारुती रोड, कापड पेठ, बालाजी चौकात अनेक ठिकाणी
स्टॉल लागले होते.
इस्लामिक
दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव नवव्या महिन्यात २९ ३० दिवसांचा रोजा ठेवतात.
त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद उल-फितर म्हणजे ईद साजरी केली जाते.
ईदसुद्धा चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते.
पवित्र रमजान
महिन्याची सुरुवात होत असून हा महिना संपूर्ण मानवजातीसाठी संयम, त्याग, बंधुभाव आणि
आत्मशुद्धीचा संदेश देणारा आहे. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून तो आत्मपरीक्षण, प्रार्थना, दानधर्म आणि
समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा महिना आहे. सर्व मुस्लिम तसेच हिंदू
बांधवांनी शांतता, सौहार्द आणि सामाजिक एकता जपून, या महिन्यात
प्रत्येकाने परस्परांप्रती आदर, सहकार्य, प्रेमभाव ठेवून सकारात्मक
वातावरण निर्माण करावे, असे आवाहन हाफिज सद्दाम सय्यद यांनी केले आहे.
0 Comments