पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण
सांगली : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच
जिल्ह्याला वैभवशाली बनविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस
संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते
ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी
अशोक काकडे, सीईओ विशाल नरवाडे, आयुक्त सत्यम
गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी,
कर्मचारी,
नागरिक,
विद्यार्थी
उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे ही एक मोठी जबाबदारी
होती. स्वातंत्र्यापूर्वी राजघराणेशाही होती. स्वातंत्र्यानंतर लोकांचे लोकांसाठी
राज्य आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
करण्यात आली. जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करुन समितीने सादर केलेला
अंतिम मसुदा दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर दि. २६
जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय
प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेमध्ये अशी रचना केली आहे
की भविष्यात त्यात बदल करावा लागणार नाही. राज्यघटना सोप्या शब्दात मांडलेली असून,
देशाच्या
एकात्मतेसाठी मार्गदर्शक सूचना त्यात आहेत.
पालकमंत्री म्हणाले, भारतीय
प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा
आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा
व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांचे आणि कायद्याचे आदरपूर्वक पालन
करणे, सार्वजनिक शिस्त राखणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक
नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जबाबदार
नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले. प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी
त्यांना मानवंदना दिली.
याप्रसंगी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा सर्वांनी
घेतली. तसेच, विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खानापूर
येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे
कार्यरत असताना शहीद झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भगत
यांचे वडील शंकर भगत यांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच सोलापूर
येथील महापुरावेळी सांगली जिल्ह्यातील स्वयंसेवक, आपदा मित्र
यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल संबंधितांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
विविध पथकांचे संचलन
प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली
पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड,
वाहतूक
विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दल, पोलीस दल बँड
पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक
वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन
वाहन आदी पथकांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम
सादर केले. विद्यार्थिनींच्या कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते जिल्हाधिकारी
कार्यालयात ध्वजारोहण
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत
गायन करण्यात आले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी शरदिनी
काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments