Ticker

6/recent/ticker-posts

दादा गेले...अखेरचा हा तुला दंडवत...

 



सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले आणि सांगली शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली. जिल्हा अक्षरशः सुन्न झाला. राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी अजितदादांच्या या अकाली निधनाने शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असताना अजितदादा पवार यांनी सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ यासह अन्य सिंचन योजना तसेच सांगली, मिरज शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सांगली, मिरजेच्या विकासासाठी आणखी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आता अपुरेच राहणार आहे. त्यांच्या जाण्याने सांगलीसह जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे.

उत्तम प्रशासक, राजकारणातील दादा माणूस, महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके दादा, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आधारस्तंभ हरपला, अनेक कार्यकर्ते पोरके  झाले. महाराष्ट्राचे न भरुन येणारे नुकसान झाले. रोखठोक व स्पष्ट स्वभावामुळे दादा महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होते. बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासात दादांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय दादांनी घेतले. प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर आणि पर्याय म्हणून प्रत्येक कार्यकर्ता अजितदादांच्याकडे मोठ्या आशेने पहात होते. भेटायला येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करुन त्यांनी आणलेल्या कामाचा निपटारा आणि जेवणासह परत जाण्याची काय व्यवस्था आहे याची दादा नेहमी चौकशी करत या त्याच्या स्वभावातून कार्यकर्त्यांबद्दल असलेली काळजी आणि तळमळ दिसून येते. त्याच्या ही वाटणीला अनेक संघर्ष आले मात्र कधी ही डगमगले नाहीत. स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर प्रचंड विश्‍वास असणारे हे व्यक्तिमत्व संघर्षातही महाराष्ट्राचे दादा राहिले. महाराष्ट्रातील सहकार वाढविण्यात दादांचे मोठे योगदान आहे. कृषीप्रधान देश तसा कृषी प्रधान महाराष्ट्र घडविण्यात दादा नेहमी आग्रही असत. चौफेर अभ्यास असणारे हे व्यक्तिमत्व कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान विकसीत व्हावे, शेतकऱयांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी नेहमी आग्रही होते. दादांचे अपघाती निधन हे मनाला न पटणारे आहे. चालते बोलते व्यक्तिमत्व अचानक सोडुन गेल्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लाखो कार्यकत्यांचा आधारवड कोसळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा दादा होणार नाहीत

इतका खंबीर आधार अचानक निघून जावा, हे वास्तव पचवणं कठीण आहे. त्यांची शब्दांत न मावणारी माणुसकी, निर्भीड निर्णयक्षमता आणि जनतेसाठी अखंड झटण्याची तळमळ आज आठवणींतून अधिक तीव्रतेने जाणवत आहे. आज महाराष्ट्राने एक दिलखुलास राजकारणी, कर्तृत्ववान आणि प्रभावी नेतृत्व गमावलं आहे. ज्याची उणीव कधीच भरून निघणार नाही.

ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. दादांच्या आठवणीच आता त्यांच्या अस्तित्वाचा श्‍वास बनून सदैव जिवंत राहतील.

सांगली आणि अजितदादा हे एक वेगळेच समीकरण होते. माजी मंत्री स्व. आर. आर. पाटील, स्व. मदन पाटील, स्व. पतंगराव कदम यांच्यासह आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. १९९० ते १९९५ या काळात या सर्व नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. त्यामुळे राजकारणात समवयस्क असलेल्या या नेत्याचा राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा दबदबा होता. मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची खाती या नेत्यांकडे होती. एकमेकांना पूरक असे विकासाचे राजकारण या नेत्यांनी आपापल्या भागात केले, शिवाय सत्तेच्या माध्यमातून एकमेकांना मदत करत भरघोस निधी देण्याचेही काम केले.

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग कायम दुष्काळी, या भागासाठी वरदान ठरणाऱ्या टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी योजना निधीअभावी रखडल्या होत्या. अजित पवार हे ऑक्टोबर १९९९ ते २०२० या प्रदीर्घ कालावधीत जलसंपदा विभागाचे मंत्री होते. या काळात जिल्ह्यातील निधीअभावी रखडलेल्या योजनांना खऱ्या अर्थाने बळ दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सिंजन योजनांना निधी देण्यासोबतच सांगली महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेत प्रशासकराज असताना अजित पवार यांनी तब्बल ५५ कोटींचा निधी शहरातील विकासकामांसाठी दिला. यातून शहरातील प्रमुख रस्ते व अन्य विकासकामे मार्गी लागली.

मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी भर दिला होता. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने मागील सहा महिन्यात अजितदादा पवार यांनी तीन वेळा मिरजेला भेट दिली होती. यावेळी विविध राजकीय कार्यक्रमांसोबतच येथील कार्यकर्त्यांशी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी सर्वांनाच आपलेसे केले होते.


Post a Comment

0 Comments