सांगलीत ग्रंथोत्सवास सुरुवात
सांगली : "छत्रपती संभाजी महाराजांना १४ भाषा अवगत होत्या, मात्र त्यांचा राज्यव्यवहार मराठीतच
होता. विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे, मल्टिनॅशनल व्हावे, पण
आपला व्यवसाय आणि व्यवहार मराठी भाषेतच करावा. जागतिक स्तरावरही आपल्या मराठीचा
डंका हवा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शांतिनिकेतन
लोकविद्यापीठ परिसरात शनिवारपासून हा ग्रंथोत्सव सुरू झाला.
काकडे म्हणाले, मराठी ही केवळ
एक भाषा नसून ती आपली मायबोली आहे, आपले संस्कार आहेत. ज्याप्रमाणे आई
प्रेम देते आणि वडील जगायला शिकवतात, तशीच ही भाषा आपल्याला समृद्ध करते.
आपली मायबोली जपली आणि जोपासली, तरच आपली खरी प्रगती शक्य आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रंथ, विविध
पुस्तकांच्या स्टॉलना भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्याहस्ते विविध स्पर्धेमधील
विजेत्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. जिल्हा
ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. लेखक कृष्णात खोत यांनी 'मराठी
भाषेचे महत्त्व' या अनुषंगाने
मार्गदर्शन केले.
प्रभारी सहायक ग्रंथालय संचालिका श्रेया गोखले,
ग्रंथालय
निरीक्षक अर्चना काळे, केदार काकडे, जिल्हा ग्रंथालय
संघाचे अध्यक्ष एकनाथ जाधव, पांडुरंग सूर्यवंशी, नवभारत
शिक्षण मंडळाचे उपसंचालक धनंजय माने, मुख्याध्यापिका समिता पाटील उपस्थित
होते.
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी
शांतिनिकेतन परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. तिचे पूजन शिक्षणाधिकारी मोहन
गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. या ग्रंथदिंडीत साहित्यप्रेमी नागरिक, शिक्षक,
विद्यार्थी,
विद्यार्थिनी
यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
0 Comments