कुपवाड : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ जणांना, तर औषधांचे टेंडर मिळवून देतो, असे सांगून अन्य
दोघांना तब्बल १ कोटी ३९ लाख ३० हजार रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
आला आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला असून, मिरज आणि कुपवाड परिसरातील पीडितांनी तक्रार दिली आहे.
सुधीर सिंग (रा. दिल्ली), उदय हावळे (रा.
मांजरी), सिकंदर बसर्गी (रा. नागराळ, जि. विजापूर), मंजुनाथ नाटेकर (रा. तांबा), अजितसिंग ऊर्फ
अभिजित कुमार (रा. नोएडा, दिल्ली) अशी
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुधीर
सिंग याने आपण रेल्वेत अधिकारी असल्याचे भासवून आपल्या चार साथीदारांच्या मदतीने
मिरज तालुक्यातील ११ तरुणांना रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवले. विश्वास संपादन
करण्यासाठी संशयितांनी रेल्वे विभागाचे बनावट जॉइनिंग लेटर तयार केले आणि त्यावर
बनावट शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवले. या बदल्यात वेळोवेळी आरटीजीएस, यूपीआय आणि रोख स्वरूपात १ कोटी २४ लाख ३० हजार रुपये उकळले. तसेच, संशयित अजितसिंग ऊर्फ अभिजित कुमार याने शीतलनाथ चोगुले आणि सचिन पाटील यांना रेल्वेमध्ये
औषधांचे टेंडर मिळवून देतो, असे सांगून १५ लाख रुपयांची फसवणूक केली. ही फसवणुकीची रक्कम १० जुले २०२३ ते २० जानेवारी २०२५ या
कालावधीत संशयितांना देण्यात आली. सचिन
पाटील यांच्या कुपवाड येथील घरात या व्यवहाराच्या बैठका झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयितांनी अजितसिंग उर्फ अभिजित कुमार यांची ६३ लाख रुपये, सुधीर सिंग यांची ३६ लाख ७७ हजार रुपये, उदय हावळे
यांची २९ लाख ६० हजार रुपये, सिकंदर बसर्गी यांची १० लाख, मंजूनाथ नाटेकर यांची ७ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये सचिन महावीर पाटील (कुपवाड), शीतलनाथ श्रीधर चोगुले, अक्षदा
शीतलनाथ चौगुले, रुबीना अकबर बेगम, अक्षय सुभाष चोगुले (सर्व रा. मिरज), गुलाब
नबी सय्यद (रा. शास्त्री चौक, मिरज), आरती खिचडे (सांगलीकर मळा, मिरज), सुशांत सनदी (रा. सलगरे, ता. मिरज), प्रतापसिंग जगताप (करोली, ता. मिरज), सचिन माने (इस्लामपूर), भूषण पाटील (हिंगणगाव),
निवास पाटील (तुपारी, ता. वाळवा) आणि
सचिन निकम (पुणे) यांचा समावेश आहे.कुपवाड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून,
यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
0 Comments