Ticker

6/recent/ticker-posts

खेळ, खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणार : स्थायी सभापती अतुल माने

 


सांगली : मी स्वतः एक खेळाडू आहे. त्यामुळे महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून खेळाला अधिक प्राधान्य देणार आहे. विकास योजनेतील क्रीडांगणांची आरक्षणे विकसित केली जातील. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास, कृष्णा नदीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा रोईंग ट्रॅक केला जाईल. खेळ व खेळाडूंसाठी दर्जेदार सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देणार आहे. भाजी मंडई, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जाणार आहे, असे स्थायी समितीचे नूतन सभापती अतुल माने यांनी सांगितले.

स्थायी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच प्रभाग समिती क्रमांक १, , ३ व ४ च्या सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ, मंजिरी गाडगीळ, सिद्धार्थ गाडगीळ, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील हे महापालिकेत आले, त्यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत माने यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजप नेत्या मंजिरी गाडगीळ, सिध्दार्थ गाडगीळ, भाजप किसान मोर्चाचे नेते पृथ्वीराज पवार, भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतुल माने म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यात आ. गाडगीळ व आ. खाडे यांचे मोठे योगदान आहे. मी महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रथमच निवडून आलो आणि थेट स्थायी समिती सभापती झालो. आ. गाडगीळ, आ. खाडे यांनी मोठी संधी दिली आहे. तीनही शहरांच्या विकासाला गती दिली जाईल. खेळ व खेळाडूंविषयक चांगले धोरण आणू. महापालिका विकास योजनेतील क्रीडांगणांचे आरक्षण विकसित केले जाईल. भाजी मंडई, चौक सुशोभीकरण केले जाईल. पिण्याचे पाणी, ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावू. आ. गाडगीळ, आ. खाडे यांच्या माध्यमातून शेरीनाला, महापालिका मुख्यालय इमारतीला निधी मिळवू. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही ड्रेनेज योजना पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जागा हस्तांतरणाचा व स्टेडियम विकासाचा प्रश्नही मार्गी लावू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करू.

सभापती अतुल माने म्हणाले, सांगलीचे भूषण बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजीअप्पा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नाव शहरातील एका रस्त्याला व चौकाला देण्यात येणार आहे. महापालिकेच्या एका इमारतीला त्यांचे नाव देण्यात येईल. याचा निर्णय लवकरच घेणार आहे.

सर्वांच्या सहकार्याने विकासाचे राजकारण : आ. गाडगीळ

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, महापालिकेत भाजपचे महापौर, स्थायी समिती सभापती झाले आहेत. मित्रपक्षाचा उपमहापौर आहे. प्रभाग समितींच्या चार सभापतींच्या निवडी झाल्या आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगला व पारदर्शी कारभार करावा अशी माझी व भाजपची अपेक्षा आहे. विकासाच्या मुद्द्द्यावर विरोधकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात गैर नाही. निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आता पक्षीय राजकारण न करता महापालिकेत सर्वांच्या सहकायनि व समन्वयाने विकासाचे काम होईल. स्थायी समिती सभापतिपदी अतुल माने यांची निवड शहराला विकासाच्या दिशेने नेईल. शेरीनाला तसेच महापालिका मुख्यालय इमारतीला निधी उपलब्ध करून दिला जाईल.


Post a Comment

0 Comments