रस्त्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याचे आदेश
सांगली : बस येथील मध्यवर्ती
स्थानकासमोरील २७ दुकानगाळे आणि ५ खोक्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस
बजावली आहे. रस्त्याच्या जागेत विनापरवाना बांधकाम केलेले गाळे, खोकी चोवीस तासां त काढून घ्या अन्यथा ती पाडण्यात येतील, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दिवाणी, फौजदारी
कारवाईचाही इशारा दिला आहे.
या नोटिसांविरोधात दि. १
एप्रिलरोजी गाळेधारक, खोकीधारकांतर्फे महापालिकेसमोर आंदोलन
करण्यात येणार आहे, अशी माहिती खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष
गणेश कोडते यांनी दिली.
सांगली बस स्थानकासमोरील रस्ता ५९
फूट (१८ मीटर) रुंदीचा आहे. मात्र सध्या हा रस्ता काही ठिकाणी ३३ फूट, काही ठिकाणी ४३ फूट, ५० फूट रुंदीने वाहतुकीस उपलब्ध
आहे. उर्वरित जागेमध्ये हातगाडे, गाळे, खोकी आहेत. हा रस्ता मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तसेच मध्यवर्ती बस स्थानक
असल्याने मोठ्या रहदारीचा, वर्दळीचा आहे. या रस्त्यावरील
अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी हा नेहमीचाच प्रकार आहे. महापालिकेच्या नगररचना
विभागाने रस्त्याच्या जागेत असलेले आरसीसी काँक्रिटचे २७ गाळे आणि ५ खोकी यांना
नोटीस दिली आहे. बांधकाम परवाना घेतला नसल्याकडे लक्ष वेधत ते २४ तासांत काढून
घेण्याचे निर्देश दिले आहेत. गाळे, खोके काढून न घेतल्यास ते
पाडण्यात येईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
महापालिकेच्या विकास योजनेत
बसस्थानकासमोरील गाळे महापालिकेने २००५ मध्ये महासभेच्या ठराव क्रमांक १६७ अन्वये
बांधून दिलेले आहेत. त्याचे भाडे महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे भरले जाते.
त्यामुळे या गाळ्यांना महापालिका विनापरवाना कसे काय ठरवत आहे? महापालिकेच्या नोटिसांमुळे संबंधित गाळेधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला
आहे, असे खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी
सांगितले.
0 Comments