Ticker

6/recent/ticker-posts

सावधान ! बेदरकार वाहनचालकांना आता 'रडार इंटरसेप्टर' टिपणार

सांगली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताफ्यात आता 'रडार इंटरसेप्टर' वाहन दाखल झाले आहे. रस्त्यांवरील बेदरकार चालकांना आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने अत्याधुनिक इंटरसेप्टर रडार वाहनांमध्ये 'लेझर गन' आणि अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. महामार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला आता आरटीओ अधिकाऱ्यांनी थांबविण्याची आवश्यकता राहिली नाही. रडार इंटरसेप्टर वाहनातील कॅमेरे आपोआप नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा फोटो काढतात. त्यानंतर थेट मोबाइलवर ई-चलन पाठविले जाते. फेब्रुवारी ते मार्च २०२६ या दोन महिन्यांमध्ये महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या २ हजार ५५ बेदरकार वाहनधारकांना ई चलान जारी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सांगली ते पेठ महामार्ग, सांगली ते मिरज महामार्ग, सांगली ते अंकली महामार्ग, अंकली ते नागज महामार्ग, आष्टा ते पेठ वडगाव मार्ग, आष्टा ते भिलवडी या मार्गावरती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित आहे. रडार-इंटरसेप्टर वाहन हे तासाला ८०० वाहनांवर लक्ष ठेवून ई-चलान जारी करू शकतात. ही सिस्टीम अतिवेगासह लेन कटिंग, सीटबेल्ट, हेल्मेट नसणे अशा गुन्ह्यांचा पुरावा कॅप्चर करून संबंधित वाहनचालकाच्या व वाहनांवर चलान जारी करते. वाहन चालवताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि मोटार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे टाळावे. वाहन चालवताना नियम   तोडू नये, असे आवाहन आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. बेदरकारपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा बेदरकार चालकांना चाप लावून आणि वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे 'रडार इंटरसेप्टर' वाहन कार्यान्वित झाले आहे. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.

 

Post a Comment

0 Comments