महिला कुस्तीत प्रतीक्षा बागडी विजेती
सांगली
: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने 'सांगली केसरी-२०२६' हा किताब पटकावला. अटीतटीच्या
लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल इराणच्या मिर्झाला दुखापत झाली. त्यामुळे सिकंदरला पुढे
चाल मिळाली. विजेत्या सिकंदरला आलिशान दुचाकी व चांदीची मानाची गदा देण्यात आली.
महिलांच्या कुस्तीत प्रतीक्षा बागडी हिने विजय मिळवला. तिला 'महालक्ष्मी केसरी' किताबाने गौरविण्यात आले.
येथील कृष्णा नदीकाठी सरकारी घाटावर
कुस्ती मैदान झाले. मिर्झा इराण विरुद्ध सिकंदर यांच्या लढतीची कुस्ती शौकिनांना
मोठी उत्सुकता होती. खचाखच भरलेल्या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती रात्री
साडेअकरा वाजता सुरू झाली. सुरुवातीपासून मिझनि आक्रमक पवित्रा घेतला होता. एकेरी,
दुहेरी पट,
मानेवर हात टाकून कस आजमावणे, यासह अन्य डाव, प्रतिडावांचे प्रदर्शन झाले.
मिर्झाने दोनवेळा पट काढून सिकंदरला चितपट
करण्याचा प्रयत्न केला. मात्र चपळ सिकंदरने मिर्झाचे हे आक्रमण परतावून लावले.
सिकंदरने हुकमी एकचाक डावावर मिर्झाला नमवण्याचा प्रयत्न केला,
मात्र ताकद व उंचीने तगडा असणाऱ्या मिर्झान सिकंदरची दमछाक केली.
वीस मिनिटांची खडाखडी व आक्रमण, संरक्षक खेळामुळे दोन्ही
मल्लांची चांगलीच दमछाक झाली. पंचविसाव्या मिनिटाला सिकंदरने आक्रमक होत मिर्झाला
ढकलून आखाड्याच्या कडेला नेले. त्यात मिर्झाला दुखापत झाली.
दरम्यान, महान
भारत केसरी माऊली जमदाडेने पुणे महाराष्ट्र केसरी गणेश जगताप याच्यावर विजय
मिळवला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत महारुद्र काळेल याने प्रशांत शिंदे याच्यावर
विजय मिळवला.
पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा
बागडी हिने उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार हिला छडीटांग डावावर नमवत 'महालक्ष्मी केसरी' किताब व एक लाख ११ हजार रुपयांचे
बक्षिस मिळवले. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सृष्टी भोसले व रिंकू नलावडे
यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली.
0 Comments