कुपवाड : हरिपूर (ता. मिरज) येथील पप्पू नावाच्या
व्यक्तीला गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य तस्कराच्या सांगली स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून मुसक्या
आवळल्या. पोलिसांनी संशयिताकडून आलिशान मोटार आणि ४२ लाख ६३ हजार ५०० रुपये
किमतीचा सुमारे १३४ किलो गांजा जप्त केला. विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भीमनगर, पिंपरी रोड, जाळोची, ता. बारामती) असे
अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे.
बारामती येथील एकजण पांढऱ्या
रंगाच्या विना नंबरच्या मोटारीमधून सांगलीत गांजा विक्रीसाठी येणार असल्याची
गोपनीय माहिती सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना बुधवारी मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली परिसरात सापळा लावला. बुधवारी
सायंकाळी संशयित मोटार भरधाव वेगाने कवलापूर, माधवनगर मार्गे
अहिल्यानगरकडे गेली. हे लक्षात येताच एलसीबीचे पथक या मोटारीचा पाठलाग करत होते.
याच वेळी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे हे अहिल्यानगर भागात
गस्तीवर होते.
अहिल्यानगरमधून ही विना
नंबरची मोटार वेगाने संजयनगरकडे जात असल्याचे दिसताच घाडगे यांनीही आपल्या
वाहनातून तिचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिस मागे असल्याचे लक्षात येताच
चालकाने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिस वाहनालाच जोरदार धडक दिली.
या धडकेत सहायक निरीक्षक घाडगे किरकोळ जखमी झाले. तरीही पोलिसांनी पाठलाग सोडला
नाही. मोटार वेगाने कुपवाड शहरातून एमआयडीसीकडे जात असताना पोलिसांनी अखेर तिला
वेढा टाकला. चालकाला ताब्यात घेतले. त्यास कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली
असता त्याने आपले नाव विकी कांबळे असे सांगितले.
पाठलाग करून गांजा तस्कराला
पकडल्यानंतर त्याने मोटारीत पेट्रोल ओतून ३३ लाखांच्या गांजासह चक्क मोटार पेटवून
देण्याचा प्रयत्न केला. परंतु पेटवलेला कागद विझल्यामुळे तो फोल ठरला. पोलिसांनी
तातडीने गांजा तस्कर विकी विजय कांबळे याला ताब्यात घेतले. त्यामुळे कांबळे याचा
प्रयत्न फसला गेला.
संशयित विकी कांबळे याने
बारामती येथील चंदनसिंह नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून, चंदनसिंहच्या
पत्नीकडून गांजा खरेदीसाठी ४ लाख ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर चंदनसिंहची आलिशान
मोटार (क्र. एमएच ०२, सीझेड ०३०२) घेऊन तो एकटाच ओडिशा राज्यातील बर्गट
जिल्ह्यातील संभलपूर येथे गेला. तेथे जॉकी नावाच्या व्यक्तीकडून त्याने १३४ किलो
गांजा खरेदी केला. हा गांजा हरीपूर येथील पप्पू नावाच्या ग्राहकाला देण्यासाठी तो
सांगलीत आला होता. याबाबतची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्ह्यात
वापरलेली मोटार आणि गांजा असा एकूण ४२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. सहायक
निरीक्षक आनंदराव घाडगे पुढील तपास करीत आहेत.
अटक करण्यात आलेला संशयित
विकी कांबळे हा केवळ गांजाची वाहतूक करणारा वाहक (कॅरिअर) आहे. या आंतरराज्य
तस्करीमागे बारामतीचा चंदनसिंह आणि ओडिशामधील मुख्य तस्कर जॉकी यांचे मोठे नेटवर्क
कार्यरत आहे. सांगली पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने या प्रकरणाचे
धागेदोरे दूरपर्यंत असण्याची आणि लवकरच अंमली पदार्थ तस्करीतील काही बडे मासे
पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments