Ticker

6/recent/ticker-posts

शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात : विविध उपक्रमांचे आयोजन

 


सांगली :  शहर व परिसरात गुरुवारी विविध मंडळे, संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती भव्य प्रमाणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित जन्मोत्सवामध्ये शिवभक्तांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील राममंदिर चौकात शंभुराजे जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नगरसेवक मयूर पाटील, राजेश नाईक यांच्याहस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे शंभर युवकांनी रक्तदान केले. दुपारी कुपवाडच्या रक्षक गुरुकुलच्यावतीने मर्दानी खेळांच्या प्रत्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे, कुन्हाड चालवणे, लाठीकाठी आदींची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली.

सायंकाळी साऊंड सिस्टिम व लाईट शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. याचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष बजरंग पाटील, अमित पवार, अभिजित पवार, रोहित शिंदे, ऋषिकेश दळवी आदींनी केले.

नवहिंद प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी रात्री बारा वाजता जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात ध्येयमंत्राने करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पाळणा गीत सादर करण्यात आले. नवहिंद प्रतिष्ठानच्या महिलांच्यावतीने जिजाऊ वंदना आणि ध्येयमंत्र सादर करण्यात आला. कार्यक्रमानंतर सुंठवडा व मिठाई वाटप करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, संतोष तावशी, उमेश चव्हाण, किशोर कचरे, संदेश चाळके, अनिकेत कराळे, शुभम माने, प्रसाद चव्हाण, अभिषेक तावशी, किरण चव्हाण, अरुण बाबर, रामदास थोरात, राजू तावशी आदी उपस्थित होते.

पाळणागीत कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजाताई इंगळे, आशाताई पाटील, दीपश्री काटकर, रूपाली चव्हाण, दीपाली चाळके, उषा चव्हाण, लीना तावशी, रूपाली बाबर, संगीता चव्हाण, नैना कचरे, अशाराणी कराळे, पूनम चव्हाण, गौरी शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.

स्टेशन चौकात नवहिंद प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी ७ वाजता पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. १५ मे रोजी अभी मुंडे यांच्या "शंभुगाथा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रेरणादायी जीवनप्रवास अभी मुंडे यांच्या वाणीतून अनुभवता येणार आहे. १७ रोजी मराठी भक्तिगीत, भावगीत तसेच शिवछत्रपती व शंभुराजांच्या जीवनावरील गीतांचा कार्यक्रम असून, १८ रोजी सायंकाळी ६ वाजता स्टेशन चौक ते शिवतीर्थ अशी पारंपरिक भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

आनंद पार्क, अभयनगर येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली. परिसर भगव्या पताका, घोषणाबाजी व शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील व भाजप नेत्या नीता केळकर यांच्याहस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वाती शिंदे, नगरसेवक दरीबा बंडगर, नगरसेवक रवींद्र सदामते, माजी नगरसेवक मनगू सरगर, सचिन सरगर, प्रताप चव्हाण, विनायक रूपनर, श्रीकांत वाघमोडे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments