कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. राजनीश कमलाकर (आर.के.) कामत यांची निवड गुरुवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी ही घोषणा केली. आदेशाची प्रत सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू ठरले आहेत. शुक्रवारी ते पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ. डी. टी. शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडे कुलगुरुपदाचा पदभार आला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.