निर्णयाचा फेरविचार करा : नगरसेवक चेतन सूर्यवंशी
कुपवाड: सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेकडून कुपवाड
परिसरातील अविकसित भागातील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने दीडपट घरपट्टी आकारणी
करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या
निर्णयाचा महापालिका प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी
कुपवाडचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी यांनी केली आहे.
ज्या भागात आजही रस्ते, गटारी, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्या भागातील
नागरिकांवर वाढीव कराचा बोजा टाकणे, हे आर्थिक अन्यायाचेच
उदाहरण असल्याची टीका चेतन सूर्यवंशी यांनी केली आहे. सूर्यवंशी म्हणाले, कुपवाडमधील अनेक भाग अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. नागरिकांना
आवश्यक नागरी सुविधा मिळत नसतानाही महापालिकेकडून दीडपट घरपट्टी आकारणी करण्यात
येत आहे. या भागातील बहुतांश नागरिक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये खासगी
नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. वाढती महागाई, रोजगारातील
अस्थिरता आणि आर्थिक अडचणी, यामुळे सर्वसामान्य कुटुंबे आधीच
त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वाढीव घरपट्टी आकारणी नागरिकांच्या अडचणीत अधिक भर
घालणारी ठरत आहे. महापालिकेने करवाढीचा निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांची आर्थिक क्षमता यांचा विचार करणे आवश्यक
होते. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेली कर
आकारणी योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. अविकसित भागातील नागरिकांना न्याय
देण्यासाठी महापालिका प्रशासनाने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, वाढीव कर आकारणी मागे घ्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी चेतन सूर्यवंशी यांनी केली आहे.
0 Comments