Ticker

6/recent/ticker-posts

'कृष्णामाई' जीवनवाहिनी; तिचे आरोग्य राखा, प्रदूषण रोखा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी, आयुक्तांचे आवाहन

 


सांगली :  कृष्णा नदी ही सांगलीची जीवनवाहिनी आहे. तिचे आरोग्य राखण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर नागरिकांचीही आहे. नदीपात्रात किंवा घाटावर निर्माल्य, प्लास्टिक व इतर कोणताही कचरा टाकू नये. शहर व नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मैनाक घोष व आयुक्त संजीता महापात्र यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कृष्णा नदी, सरकारी घाट येथे नदीपात्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हाधिकारी मैनाक घोष आणि आयुक्त संजीता महापात्र यांनी प्रत्यक्ष सहभागी होत नदी संवर्धनाचा संदेश दिला.
महापालिकेच्या वतीने गव्हन्मैट कॉलनी परिसरातील नाना-नानी पार्क येथे १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. मालमत्ता व कर विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशी वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीबरोबरच संगोपनाची जबाबदारीही उद्यान विभागाने स्वीकारली आहे.
महापालिकेचे स्वच्छता दूत, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी नदीपात्रात उतरून कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि टाकाऊ वस्तू गोळा केल्या. निर्धार फाउंडेशनचे संस्थापक राकेश दड्डुणावर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिकांनी श्रमदान केले. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, सहायक आयुक्त विनायक शिंदे, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, अतुल आठवले, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, कीर्ती देशमुख, अलका ऐवळे, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, सहायक आयुक्त विनायक शिंदे, ऋतुराज यादव, गिरीश पाठक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments