Ticker

6/recent/ticker-posts

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे पूर्ण करावी : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम



सांगली : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवली जाणार आहे. यामध्ये घराघरात जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कोणत्याही पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी. एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी. यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी सतर्कतेने कार्यवाही करावी, अशा सूचना अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी येथे दिले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 'विशेष सखोल पुनरिक्षण' कार्यक्रमाच्या बैठकीच्या आढावा अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम म्हणाले, विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरोघरी प्रत्यक्ष जाऊन मतदारांना गणना प्रपत्राचे वाटप व भरलेले अर्ज परत घेतील. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करुन दोषविरहीत आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. तयार होणारी मतदार यादी ही केवळ दुरुस्त किंवा सुधारित नसून संपूर्ण नव्या स्वरूपातील असेल. ही प्रक्रिया राबवताना बूथ लेव्हल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तंतोतंत कार्यवाही करावी. आवश्यकतेनुसार यासाठी शिबीर आयोजित करावे, असे ते म्हणाले. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम म्हणाले, ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी प्रत्येक बीएलओ आणि बीएलए यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकांतील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्‍चित करावा. तसेच, प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदविणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची तपासणी अचूक पद्धतीने करावी. मात्र, नागरिकांना याचा त्रास होणार नाही तसेच गणना अर्जांची छपाई विहित वेळेत पूर्ण होईल, यासाठी दक्ष राहावे, चोकलिंगम यांनी मतदार नोंदणी अधिकारी संवाद साधून प्रत्यक्ष कार्यवाही, संभाव्य शंका याबाबत सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

0 Comments