सांगली : शहरातील मेडिकल दुकानदारांना गेल्या काही दिवसांपासून
गुंड प्रवृत्तीच्या व नशेखोर मुलांकडून चाकूचा धाक दाखवणे, धमक्या देणे आणि बळजबरीने पैसे व
प्रतिबंधात्मक औषधे पळवून नेण्याच्या
घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या त्रासाविरोधात सांगली शहर केमिस्ट अँड
ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात
त्यांनी म्हटले आहे, नुकतीच कर्नाळ रोडवरील
वैभव मेडिकलमध्ये घुसून ३-४ नशेखोरांनी मालकांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी
केल्याची गंभीर घटना घडली असून, यावर सांगली शहर पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या नशेखोरांचा बंदोबस्त न
केल्यास व्यवसाय करणे कठीण झाले असून, दुकानदारांच्या जिवाला धोका निर्माण
झाला आहे.
पोलिस
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नशेखोर व गुंडांवर तातडीने कडक कारवाई
करावी. अन्यथा, असोसिएशनच्या सर्व सभासदांची बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला
आहे. यावेळी विनायक शेटे, सागर साठे, प्रणव उंडे आदी उपस्थित होते.
0 Comments