Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग १७ मध्ये भाजी मंडई बनली नशेखोरांचा अड्डा

 


सांगली : प्रभाग क्रमांक १७ मध्ये दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पालकमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन झालेली महापालिकेची भाजी मंडई आज बंद अवस्थेत असून येथे नशेखोरांचा अड्डा बनला आहे. स्थानिक नगरसेवकांनी फक्त स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. सहा महिने उलटून गेले महापालिका, नगरसेवकांनी भाजी मंडई सुरु करण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. त्यामुळे ही सुंदर वास्तू बंद व भकास अवस्थेत असल्याचा आरोप करुन तत्काळ भाजी मंडई सुरू करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी आयुक्त संजीता महापात्र व सभापती अतुल माने यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, प्रभाग क्रमांक १७ मधील ज्या भाजी मंडईचे उ‌द्घाटन झाले त्याची दर्शनी बाजू रंगरंगोटी करुन लाली पावडर लावली आहे. मागील बाजूस शौचालय अत्यंत भकास अवस्थेत आहे. फक्त मुरूम टाकून, निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. सदरच्या वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री यांनी केले आहे. अर्धवट काम करुन फक्त श्रेय लाटण्यासाठी नगरसेवकांनी केलेले उद्घाटन ही पालकमंत्राची दिशाभूल केली आहे. शंभर फुटी रोडला घाटगे पाटील शोरूम समोर जो भाजीपाला सौदा होतो तोच सौदा या भाजी मंडईमध्ये सकाळी झाला पाहिजे. यामुळे रस्त्यावर विकली जाणारी भाजी ही नागरिकांना बंदीस्त वास्तु मध्ये व स्वच्छ ठिकाणी मिळेल. तसेच या ठिकाणी भाजीपाला सौदा सुरु झाल्याने लोकांनाही समजेल की या ठिकाणी भाजी मंडई आहे. लोकांची भाजी खरेदीसाठी ये-जा सुरु होईल. त्यामुळे महापालिका प्रशासन व नगरसेकांनी यात लक्ष घालून तात्काळ ही भाजी मंडई पूर्ण क्षमतेने सुरु करावी तसेच निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी स्थायी समिती सभापती अतुल माने, अमर पडळकर, नगरसेवक विष्णू माने, अभिजीत भोसले, शहाजी भोसले, समीर मोमीन, वरद पडळकर, बसवेश्वर औंधे, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments