सांगली : सांगली, मिरजसह जिल्हाभर शनिवारी बकरी ईद अर्थात ईद-उल्-अजहा मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि बंधुभावाच्या भावनेत साजरी करण्यात आली. सकाळपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सांगलीतील शाही ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक पोशाख, एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश यामुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. ईदच्या नमाजनंतर शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत 'ईद मुबारक'च्या शुभेच्छा दिल्या. समाजात बंधुभाव, शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विविधधर्मीय नागरिकांनीही ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध मशिदींमध्येही ईदची नमाज शांततेत पार पडली. प्रशासनाच्यावतीने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तामुळे सर्व कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडले. मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाही ईदगाह मैदानावर भेट देत संवाद साधला. जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, वाहतूक निरीक्षक मुकुंद कलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी, विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
सांगली वेथील ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा झाली. सालाबाद प्रमाणेमुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, नगरसेवक अभिजित कोळी व विजय खेत्रे यांच्या माध्यमातून गाईला राष्ट्रीय गाय माता म्हणून घोषित करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली. असंख्य मुस्लिम बांधवांनी सदर मागणी करून सह्या करून पाठिंबा दिला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, मनपा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्या मोहिमेत सामील होऊन पाठिंबा दिला. आसिफ बावा, युसुफ जमादार, युनूस महात, अकबर शेख, आयाज मुजावर व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
गोमातेसाठी सह्यांची मोहीम
भारत सरकाने गाईला राष्ट्रीय गोमाता म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी आज नमाज झाल्यानंतर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. समस्त मुस्लिम समाज, नगरसेवक अभिजित कोळी यांच्यावतीने आयोजित या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, असिफ बावा, विजय खेत्रे, मंगेश चव्हाण, युनुस महात, अकबर शेख, सतीश साखळकर, युसुफ जमादार, अग्याज मुजावर, मुन्ना कुरणे यांनी या अभियानात सहभाग घेतला,
मिरजेत सामुदायिक नमाजपठण
मिरज : मुस्लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त गुरुवारी सकाळी येथील ईदगाह मैदानासह विविध दर्गाह व मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण केले. हिंद, ख्रिश्चन सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील अली रजा मस्जिद, कमानवेस मस्जिद, बारा इमाम मस्जिद, चिनावली मस्जिद, बकर कसाब मस्जिद, भंडारी बाबा मस्जिद, झारी मस्जिद या ठिकाणी सामुदायिक नमाजपठण केले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, नगरसेवक सागर बनखंडे, समीर मालगावे आदींनी शुभेच्छा दिल्या.
कुपवाड सह ग्रामीण भागात ईद
कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कुपवाड शहरासह ग्रामीण भागातील सावळी, तानंग येथे मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली.
0 Comments