Ticker

6/recent/ticker-posts

चांगल्या कामाला पाठिंबा, चुकीला विरोध : आ. विश्वजित कदम

 


सांगली : महापालिकेत चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, मात्र चुकीच्या गोष्टींना विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी सांगलीत महापालिकेत महापौर, भाजप व राष्ट्रवादीचे गटनेते यांच्याशी चर्चेवेळी व्यक्त केली. डॉ. कदम यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

महापालिकेत आगमनानंतर आ. डॉ. कदम यांनी सर्वप्रथम महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या दालनाला भेट दिली. महापौर सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे नेते डॉ.

सांगली: काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांचे स्वागत करताना महापौर धीरज सूर्यवंशी. यावेळी मैनुद्दीन बागवान, संदीप आवटी, मंगेश चव्हाण, संजय मेंढे, डॉ. जितेश कदम उपस्थित होते. (छाया: सचिन सुतार)

जितेश कदम, नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, मयूर पाटील, फिरोज पठाण तसेच अन्य नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर आ. कदम यांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या दालनाला भेट दिली. 'तुम्ही आमच्या केबिनमध्ये आलात, याचा आनंद आहे,' असे ते म्हणाले. यावर बोलताना, 'जुने कार्यकर्ते म्हणून काही वाटलं तर जरूर सांगा,' असे आ. कदम यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यानंतर आ. कदम यांनी स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्या दालनाला भेट दिली. सभापती अतुल माने, माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी आ. कदम यांचे स्वागत केले. मयूर पाटील, विशाल कलगुटगी तसेच नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर डॉ. कदम यांनी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी यांच्या दालनालाही भेट दिली. यावेळी संदीप

आवटी आणि निरंजन आवटी यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान विविध पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हलक्याफुलक्या वातावरणात संवाद रंगला. यानंतर कदम यांनी काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांच्या दालनाला भेट देऊन नगरसेवकांशी संवाद साधला.

आ. कदम यांनी महापौर सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे गटनेते बागवान यांच्याशी संवाद साधला. यावेळी आ. कदम म्हणाले, 'महापालिकेच्या कारभारात जे चांगले काम होईल त्याला आम्ही निश्चित पाठिंबा देऊ. मात्र नागरिकांच्या हिताच्या विरोधात किंवा चुकीचे काही घडत असेल, तर त्याकडेही लक्ष वेधू, चांगल्याला चांगलं म्हणू आणि चुकलं तर चुकलं म्हणू.' त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही मिश्किल शैलीत उत्तर देताना, 'काही चुकलंय असं तुम्हाला समजलं तर आम्हाला सांगा. ते चुकीचं कसं नाही, हे आम्ही सांगू,' महापौरांच्या या उत्तरावर हशा पिकला.


Post a Comment

0 Comments