सांगली : 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा
द्यावा, विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर
कारवाई करावी आणि धार्मिक द्वेष पसरवणे थांबवावे, या
मागण्यांसाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळपासून स्टेशन
चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दिल्लीतील आंदोलन संपेपर्यंत रोज
सायंकाळी हे धरणे आंदोलन सुरू राहील, असा इशारा
आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 'नीट' पेपरफुटीमुळे
व पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याच्या नैराश्यातून २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या
केल्या आहेत. या आत्महत्यांना ही व्यवस्थाच जबाबदार असून, तिचे
नेतृत्व करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा
दिला पाहिजे. तसेच दिल्ली पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर
केलेला लाठीमार अत्यंत निषेधार्ह असून, या संपूर्ण प्रकरणाची
सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी या वेळी करण्यात आली.
या आंदोलनात उमेश देशमुख, विकास मगदूम, सतीश साखळकर, डॉ.
संजय पाटील, रेहाना शेख, नितीन चव्हाण,
ज्योती अदाटे, वंदना साबळे, माधुरी देशमुख आणि नंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले
होते.
0 Comments