मिरज : शहरातील वानलेस चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, शासकीय रुग्णालय चौक,
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या विविध ठिकाणी काल (गुरुवार)
महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. सुमारे १००
हून अधिक खोकी व दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी या
मोहिमेला जोरदार विरोध केला. मात्र हा विरोध झुगारून ही मोहीम राबविण्यात आली.
शहरात काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम
राबवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आयुक्त गांधी यांची बदली झाली. त्यानंतर ही
मोहीम थंड पडली होती. काल अचानक अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. सुरक्षा
रक्षकांसमवेत जेसीबीच्या साहाय्याने ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. येथील
कर्मवीर भाऊरावपाटील चौकामध्ये असणाऱ्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात
आले. काही खोकी काढण्यात आली. पुढे याच रस्त्यावरून मिरज शासकीय रुग्णालयाकडे
जाणाऱ्या रस्त्यावर देखील खोकी होती. ती खोकी देखील हटवण्यात आली. काही दुकानांनी
या ठिकाणी अतिक्रमण केले होते. ते देखील जेसीबीच्या काढण्यात आले. छत्रपती शिवाजी
महाराज रस्त्यावर देखील अनेकांनी दुकानांच्या बाहेर फलक लावले होते व अन्य
अतिक्रमण केले होते. ते देखील काढण्यात आले. याच रस्त्यावर काही खोकी उभारण्यात
आली होती. ती देखील काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या
अधिकाऱ्यांना काही व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र हा विरोध झुगारून ही मोहीम राबवण्यात
आली.
यापुढे देखील अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यांनी
असे अतिक्रमण केले आहे, ते अतिक्रमण काढून घ्यावे. अशा
अतिक्रमणामुळे अपघात होऊ लागले आहेत. जर यापुढे एखादा असा अपघात झाला, तर हे व्यावसायिकच त्याला जबाबदार असतील. त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर
कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी
दिला आहे.
0 Comments