सांगली : अखेर
सांगली-मिरज-कुपवाड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी महापालिकेचे
माजी स्थायी समिती सभापती राजेश नाईक यांची निवड झाली. काँग्रेस पक्षाचे
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून त्यांची नियुक्ती करण्यात आली
असून तसे पत्र त्यांना प्राप्त झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत महत्त्वाचे
पण रिक्त असलेल्या यापदाला अखेर नाईक यांच्या रूपाने कारभारी मिळाला.
महापालिकेवर झेंडा
फडकवण्यासाठी महायुती जोरदार तयारीला लागली असताना दुसऱ्या बाजूला ज्याने पुढे
होऊन ही लढाई लढायची, त्या
शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची निवड रखडत चालली होती. लांबत चाललेली निवड
निष्ठावंतांची अस्वस्थता वाढवत होती. खालून कार्यकर्त्यांना आणि वरून प्रदेश आणि
राज्य काँग्रेसला काहीच हालचाल करता येत नव्हती. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष
पदासाठी माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, राजेश नाईक, संजय
मेंढे, मंगेश चव्हाण,
मयूर पाटील यांच्यासह अनेकजण इच्छुक
होते. त्यानंतर राजेश नाईक की मंगेश चव्हाण या वळणावर निर्णय येऊन थांबला होता. आ.
विश्वजित कदम आणि खा. विशाल पाटील यांच्यात आपापल्या कार्यकर्त्याचा हट्ट धरला जात
होता. शहर जिल्हाध्यक्ष कोणाचा? विश्वजित
यांचा की विशाल यांचा ? यात
घोडे अडले होते. कोणाचीही निवड करा, पण आता ती लगेच करा, अशी रोखठोक मागणी कार्यकर्त्यांमधूनच जोर धरू लागल्यानंतर अखेर
आज राजेश नाईक यांची निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष राजेश नाईक म्हणाले, काँग्रेस पक्ष हा
तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जपलेला पक्ष आहे. कुणी कितीही प्रयत्न केले
तरी हा पक्ष लोकांच्या मनातून संपणार नाही. उलट तो आणखीनच ताकतीने उभा राहील.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक समोर असताना
काँग्रेस पक्षाने पुन्हा नव्या जोमाने फळी उभा केली आहे. आमचे नेते आ. डॉ.
विश्वजित कदम आणि खा. विशाल पाटील यांच्या एकीची वज्रमूठ या महापालिकेच्या
निवडणुकीत दिसून येईल. ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने लढू आणि जिंकूच, परंतु या पुढील प्रत्येक स्थानिक
निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व सिद्ध करून दाखवू.

0 Comments