Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण विद्यार्थ्यांनी अधिकारी बनून सेवा करावी : अमित पाटील

 

जलसंधारण अधिकारी साबिया मुलाणी यांचा गौरव


तासगाव : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. त्यांना योग्य संधी आणि साधनांची गरज आहे. वासुंबे येथील विद्यार्थ्यांनी या पुस्तकालयाचा आधार घेऊन जिद्दीने अभ्यास करावा. प्रशासकीय सेवेत उच्च पदे प्राप्त करुन समाजाची सेवा करावी, असे प्रतिपादन वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील यांनी केले. वासुंबे येथील ग्रामपंचायत वाचनालयास अमित पाटील यांच्याहस्ते स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे संच भेट देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

एमपीएससी, सरळसेवा, पोलीस भरती, बँकिंग आणि राज्यसेवा अशा विविध परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारा अद्ययावत पुस्तक संच वाचनालयाला सुपूर्द करण्यात आला. अमित पाटील म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. वासुंबे गावातील एकही विद्यार्थी पुस्तकाअभावी मागे राहू नये, हीच आमची भावना आहे. इथल्या मातीतून भविष्यात अनेक सनदी अधिकारी निर्माण होतील असा विश्वास वाटतो.

साबिया मुलाणी हिची जलसंधारण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अमित पाटील यांच्याहस्ते विशेष गौरव करण्यात आला. साबियाचे यश हे गावातील इतर मुलींसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे अमित पाटील यांनी यावेळी नमूद केले. सरपंच जयंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश एडके, ग्रामपंचायत सदस्य निलेश चव्हाण, कुंडलिक एडके, सतीश एडके, सागर भोसले आणि राजेंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थ, तरुण आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments