Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीत शिवजन्मकाळाचा जल्लोष : जिल्हा प्रशासनातर्फे भव्य पदयात्रा

 


सांगली : शिवजन्मकाळाचा माध्यरात्री जल्लोष शिवप्रेमींनी अनुभवला, सकाळपासून सांगलीसह उपनगरातील चौकाचौकात शिवजयंतीचा उत्साह, शहरातील कोपरा अन् कोपरा भगव्या ध्वजांनी झळकला होता.

छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी... जय शिवाजी.... हर हर महादेवऽऽच्या जयघोषात सांगलीसह जिल्ह्यात गुरुवारी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटे, झेंडे, फलकांमुळे सर्वत्र वातावरण शिवमय झाले होते.

महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, नितीन चव्हाण, धनंजय वाघ, योगेश सूर्यवंशी, प्रवीण पाटील, सुनील जाधव, रोहित पाटील, अमोल चव्हाण, योगेश पाटील, बाळ सावंत, सुधीर सावंत, ऋषिकेश पाटील उपस्थित होते.



सायंकाळी स्टेशन चौकातील संयुक्त छत्रपती शासन, बायपास रस्त्यावरील संयुक्त हिंदवी स्वराज्य, शिवाजी मंडईजवळील मित्रत्व युथ फाउंडेशनची भव्य मिरवणूक यामुळे शिवजयंतीचा झगमगाट सांगलीकरांनी अनुभवला, मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फाउंडेशन व मराठा क्रांती मोर्चा शिवजन्मोत्सव समितीतर्फे मर्दानी खेळाचा थरार, नेत्रदीपक लेसर शो आणि महाआरती कार्यक्रमातून शिवगर्जना घुमली. मंगळवारी सायंकाळी मध्यरात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हजारो कार्यकर्ते एकवटले होते. 'जय भवानी जय शिवाजी' अशा जयघोषासह फटाक्यांच्या आतशबाजीत जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. पहाटेपासून मारुती चौकात सांगली शहरासह उपनगरातील कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी जमले होते. पारंपरिक वेषभूषेतील महिलांनी शिवजन्मकाळाचा पाळणा म्हटला, शहरासह उपनगरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, सायंकाळी स्टेशन चौकातून मिरवणूक निघाली, संयुक्त हिंदवी स्वराज्यची बायपास चौकातून तर शिवाजी मंडईजवळून मित्रत्व युथ फाउंडेशनची मिरवणूक निघाली.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे 'रयतेच्या राजाला' आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा केला. जिल्हा परिषद ते मारुती चौक मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य 'मेगा पदयात्रे'ने सांगली नगरी शिवमय झाली होती. "जय शिवाजी, जय भवानी" या घोषणा आणि लेझीमच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पदयात्रेचा प्रारंभ जिल्हा परिषद येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त सत्यम गांधी, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, तहसीलदार लीना खरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पदयात्रा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आकर्षणाचे केंद्र ठरली. तलवारबाजी आणि लाठी-काठीने डोळ्यांचे पारणे फेडले. मल्लखांब आणि लेझीम: पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी लेझीमचा ताल धरना, तर मल्लखांबावरीन कसरतीनी सर्वांना थक्क केले, शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या पोवाड्यांनी वातावरणात वीररस भरला. या पदयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक आणि विद्यार्थी. अनेक बालकांनी 'प्रतीकात्मक बाल शिवबा' आणि 'बाल जिजाऊ यांचे रूप साकारले होते.


Post a Comment

0 Comments