Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीच्या महापौरपदी धीरज सुर्यवंशी बिनविरोध

 


सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करता काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आघाडीने माघार घेतली. त्यामुळे महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या विशेष सभेत होईल. दरम्यान, काँग्रेसने न लढता भाजपला बाय दिला, अशी चर्चा आणि तर्क-वितर्क राजकीय गोटात चांगलेच रंगले आहेत.
महापौर, उपमहापौर पदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित होते. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील एका हॉटेलमध्ये भाजप नगरसेवक व भाजप शहर जिल्हा कोअर कमिटी नेत्यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचे नाव जाहीर केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, भाजपचे नेते दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, सुरेश आवटी प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.
उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम यांचे नाव जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सकाळी १० वाजता शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांना मगदूम यांचे नाव कळवले.
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व नगरसेवक बुधवारी दुपारी बारा वाजता महापालिकेत दाखल झाले. धीरज सूर्यवंशी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूर्यवंशी यांनी चार अर्ज दाखल केले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केला. त्यांनी दोन अर्ज दाखल केले. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची युती झाल्याने त्यांचे महापालिकेतील संख्याबळ ५५ पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे युतीचे नेते, कार्यकर्ते यांच्यात उत्साह होता. विजयाची औपचारिकता केवळ बाकी होती.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी आघाडी झाली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने या आघाडीशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. शिवसेनाही स्वतंत्रपणे लढली होती. निवडणुकीत भाजपला ३९ जागा मिळाल्या. भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेने हुकले. काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ३, तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष अशी युती झाली आहे. या युतीचे संख्याबळ ५५ पर्यंत पोहोचले आहे.
धीरज सूर्यवंशी यांना गेल्या टर्ममध्ये उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपद दिले असताना, पुन्हा महापौर पदासाठी का निवडले याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्यावेळी महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षातल्या सहा जणांनी बंडाळी केल्याने पक्षाचे महापौरपदाचे अधिकृत उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. त्याचे शल्य पक्षाला होते. त्यामुळे त्यांना संधी दिली आहे. स्थायी समिती तसेच इतर समित्यांच्या सभापती निवडीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्याला थोडा वेळ लागेल. ज्या-त्या वेळी ठरेल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा-दहा महिन्यांचा कालावधी न करता दोनच टप्पे करावेत, असे सुचवले आहे. त्यानुसार सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेबाबत काळाच्या ओघात ठरवू. आताच सर्वकाही ठरवण्याची गरज नाही. दुसऱ्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार, हे त्या-त्या वेळी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments