Ticker

6/recent/ticker-posts

विकासकामांत दिरंगाई, ठेकेदारांवर कारवाई : आयुक्त गांधी

 

सांगली : महापालिकेच्यावतीने शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. मात्र काही कामांत ठेकेदार दिरंगाई करत आहेत तर काही ठिकाणी काम अतिशय संथगतीने होत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः शहरातील अकरा विकास कामांची स्थळ पाहणी केली. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा गांधी यांनी दिला तसेच प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा आणि गती तपासण्यासाठी गांधी यांनी धडक स्थळ पाहणी दौरा केला. यावेळी आयुक्तांनी कामचुकारपणा करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपअभियंता महेश मदने आणि संबंधित कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.

आयुक्त गांधी यांनी शहराच्या विविध भागातील क्रीडा, उद्यान आणि सभागृह अशा ११ प्रमुख कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यात गणेशनगर स्विमिंग टँक लोकमान्य व्यायाम शाळा, स्केटिंग ट्रॅक आणि वसंतदादा कुस्ती आखाडा, वकील कॉलनी हनुमाननगर उद्यान (वॉर्ड १५), विष्णू अण्णा चिल्ड्रन पार्क आणि त्रिकोणी बाग (वॉर्ड १७), गुलमोहर कॉलनी बॅडमिंटन हॉल, विठ्ठल मंदिर सभागृह, गुलाब कॉलनी साई मंदिर सभागृह आणि वालनेसवाडी ओपनस्पेस हॉल व कंपाऊंड वॉल आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे विहित मदतीत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत रुजू करावीत. कामाचे डिझाईन आणि अंदाजपत्रकानुसारच काम होत असल्याची खात्री करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी कंत्राटदारांना तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश दिले. शहर अभियंता व त्यांच्या पथकाने सर्व कामांचे डिझाईन व अंदाजपत्रकासह उपस्थित राहून आयुक्तांना माहिती दिली

नागरिकांच्या करातून उभी राहणारी ही सार्वजनिक कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. वर्क ऑर्डर देऊनही जी कामे रेंगाळली आहेत, त्या कंत्राटदारांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरातील उद्याने आणि क्रीडा संकुलांच्या कामांना आम्ही प्राधान्य देत असून विहीत मुदतीत सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त, सत्यम गांधी यांनी यावेळी दिले.  


Post a Comment

0 Comments