Ticker

6/recent/ticker-posts

गुढीपाडवा उत्साहात साजरा : भव्य शोभायात्रा , महिलांची बाईक रॅली

 


सांगली : शहर आणि परिसरात गुढीपाडवा अर्थात मराठी नवर्षांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी पारंपरिक वेशभूषेत गुढी उभारून, तोरणे लावून आणि रांगोळ्या काढून विजय व समृद्धीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने ढोल ताशांचा गजर, भव्य शोभायात्रा आणि सामाजिक संदेशांनी शहर परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते

शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या, रस्त्यावर भव्य, सुबक, कलात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंगलमयी, प्रसन्न वातावरणात शहर व परिसरात हिंदू नववर्षारंभ गुढीपाडवा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सांगली उत्सव समितीच्यावतीने महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती. त्याचबरोबर शोभायात्रेमध्ये विविध पथकांची मिरवणूक लक्षवेधी ठरली. गुढीपाडव्याच्यानिमित्ताने गुरुवारी सकाळी विविध संस्थांतर्फे चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात आल्या. ढोल, लेझीम, शंखनाद, झांज आदी पथकांचे लयबद्ध संचलन करण्यात आले. भगव्या ध्वजांसह पारंपरिक पोषाखात बांधवांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. तसेच काटदार फेटे, नाकात नथनी, नऊवारी साडी अशा मराठमोळ्या पोषाखातील महिलांचाही सहभाग लक्षवेधी ठरला.


गणपती पंचायतन संस्थानतर्फे पारंपरिक राजगुढी उभारण्यात आली. विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते हा सोहळा पार पडला. त्यानंतर गणेश मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये ढोल-ताशे, लेझीम, तुतारीच्या गजरात सांगलीकर सहभागी झाले होते. त्याचबरोबर बैलगाडीतून बालचमू सहभागी झाले होते. राजवाडा चौकात बाल शिवाजीसह विविध वेशभूषेतील बालचमू सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांचे कौतुक केले. महिलांची बाईक रॅली झांज, लेझीम पथकांसह गणपती मंदिर, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, राममंदिर, पुष्पराज चौक, आपटा पोलिस चौकी आदी मार्गावरून माधवनगर रोडवर नेण्यात आली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गणपती मंदिरात गर्दी केली होती. त्याचबरोबर शहरात 'सूर पहाटेचे' यासह लहान, मोठ्या विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.




Post a Comment

0 Comments