Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेत खरेदी-विक्रीतून १८३ कोटी मुद्रांक शुल्क जमा

 

सांगली : गत आर्थिक वर्षात सांगली, मिरज आणि कुपवाड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीतून सुमारे १८३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाकडे जमा झाले आहे.

वर्षभरात तिन्ही शहरांत ३०,००० दस्तांची नोंदणी करण्यात आली. संपलेल्या आर्थिक वर्षात सांगली सह दुय्यम निबंधक कार्यालयाने सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे.

सांगलीत सुमारे १४,००० दस्त नोंदणीपासून ९८ कोटी ७४ लाख रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले. त्यापाठोपाठ कुपवाड कार्यालयात ७,००० दस्त नोंदणीपासून ४५ कोटी ७८ लाख रुपये उत्पन्न आणि मिरजेत ७,२८५ दस्त नोंदणीपासून ४७कोटी ७६ लाख रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले आहे.

तिन्ही कार्यालयांपैकी कुपवाड दुय्यम निबंधक कार्यालय महसूल संकलनात मिरजच्या बरोबरीत आहे. विशेष म्हणजे, सुटीच्या दिवशीही येथे कामकाज सुरू असल्याने व्यवहारांची संख्याही वाढली आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षात तिन्ही शहरांतून सुमारे १७५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले होते. यावर्षी त्यात वाढ झाली आहे.

स्थावर मालमत्ता व्यवहारांची संख्या वाढत असल्याने शासनाचे उत्पन्नही वाढत आहे. एकूण, सांगली-मिरज-कुपवाड परिसरात स्थावर मालमत्ता व्यवहारांपासून महसूल संकलन वाढत आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीपत्र, करारपत्र, बक्षीसपत्र, तारण, गहाण, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, मान्यतापत्र, वटमुखत्यारपत्र आदी विविध दस्तांच्या नोंदणीसाठी साधारणतः १ ते ७ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. दरवर्षी एक एप्रिलपासून मूल्यांकन दरात वाढ होते, यावर्षी मूल्यांकन दर वाढले नसल्याने मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.

 

 

Post a Comment

0 Comments