सांगली : महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज 'राजमाता जिजाऊ' बस सेवेची सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात
टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सांगली
विभागाने महामंडळाकडे १६० राजमाता जिजाऊ बसेसची मागणी केली आहे. या नव्या बसमुळे
लालपरीचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
ही गाडी ग्रामीण
वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असली तरी सोयी-सुविधा देण्यात कोणती कसर सोडलेली
नाही. महिलांवरील अत्याचार, चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही
कॅमेरे, पॅनिक बटण, आरामदायक सिट्स, रुंद खिडक्या, यासह मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आल्या आहेत.
या बसची रचना
आधुनिक 'माईल्ड स्टील' वापरून करण्यात आली आहे. गाडीचे सस्पेंशन उत्तम दर्जाचे असल्याने
प्रवाशांना धक्के कमी बसतील.
बसमध्ये 'पब्लिक अॅड्रेस
सिस्टिम' आहे. बस थांब्याची ध्वनिक्षेपकाद्वारे
आगाऊ माहिती प्रवाशांना दिली
जाईल.
या बसेस शहरांना
जोडणाऱ्या मार्गावर 'शटल सेवा' म्हणून चालवल्या जातील. सांगली -
कोल्हापूर, सांगली -इचलकरंजी, मिरज-कोल्हापूर, मिरज -इचलकरंजी, ईश्वरपूर - कोल्हापूर, ईश्वरपूर - सांगली, पलूस - सांगली, तासगाव - सांगली, जत सांगली, विटा -सांगली, विटा कराड, आटपाडी -सांगली या मार्गावर नव्या बसेस
धावतील.
महामंडळाच्या
बसेसमध्ये २४२ आसन रचनेवर भर दिला जात होता. पुन्हा ३ बाय २ ही आसन रचना परतली
आहे. यामुळे ५६ प्रवासी बसून प्रवास करतील.
सांगली
जिल्ह्यातील आगारांसाठी १६० राजमाता जिजाऊ बसेसची मागणी नोंदविली आहे. बसेस उपलब्ध
झाल्यानंतर प्रवाशांना 'हायटेक' प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सांगली विभाग नियंत्रक, सुनील भोकरे यांनी दिली.
0 Comments