Ticker

6/recent/ticker-posts

दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मित्रांचा मदतीचा हात !

 


मिरज : आरग (ता. मिरज) केंद्रशाळेअंतर्गत प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या विजय कदम यांचे दीर्घ आजाराने महिनाभरापूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता पुरुष असा अचानकपणे गेल्याने कदम कुटुंबावर संकट कोसळले. अशा संकटकाळात विजय कदम यांचे शिक्षक मित्र मदतीला धावून आले. १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत संकलित करून कुटुंबीयांकडे सुपुर्द केली.

आरग (ता. मिरज) येथे दिवंगत शिक्षक विजय कदम यांच्या कुटुंबीयांना सहकारी शिक्षकांनी मदतीचा हात देऊ केला.

आरगमधील विजय कदम यांनी अनेक वर्षे वसतिशाळा शिक्षक म्हणून काम केले. कालांतराने वसतिशाळेचे रूपांतर नियमित शाळेत झाल्याने कदम यांची नियुक्तीही नियमित शिक्षक म्हणून झाली. त्यांनी द्विशिक्षकी शाळेत सेवा करीत अनेक विद्यार्थ्यांना घडवले. महिनाभरापूर्वी जुन्या दुखण्याने डोके वर काढले, वैद्यकीय उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. पण त्याचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले. वैद्यकीय खर्चासाठी सर्व पुंजी संपली शिक्षक विजय कदम यांच्या औषधोपचारासाठी घरातील सारी पुंजी खर्च झाल्याने कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक बनली होती. तीन मुलींच्या शिक्षणाचा मोठा खर्च होता. अशा परिस्थितीत कदम यांचे सहकारी मदतीसाठी पुढे झाले. शिक्षकांना आवाहन केले. दोन दिवसांत ३५ हजार रुपयांची मदत गोळा झाली. त्यानंतरही हा मदतीचा यज्ञ सुरूच होता. महिन्यात तो लाख रुपयांवर पोहोचला. त्यात भर घालून १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत सहकारी शिक्षकांनी कदम कुटुंबीयांकडे सुपुर्द केली.

शिक्षकांनी सांगितले, जुन्या पेन्शन योजनेत नसल्याने कदम यांना मृत्यूपश्चात शासकीय लाभ मिळाले नाहीत. भविष्यात कदम यांच्या पत्नी आणि मुली कुटुंबाला सावरतीलही, पण सध्या त्यांच्यापुढे संकटांचा डोंगर उभा आहे. तो हटविण्यासाठी अल्पशी ताकद लावली. या उपक्रमात विजय बोकारे, सुनील लांडगे, प्रताप पवार, पठेराव गुंडवाडे, गणेश कदम, प्रमोद कोरे, पोपट निकम आदींनी पुढाकार घेतला.

 

 

 

Post a Comment

0 Comments